|
सिंधुदुर्ग – दोडामार्ग तालुक्यातील आडाळी औद्योगिक क्षेत्रात उद्योग आणणे आणि येथील भूमी उद्योगांसाठी देण्याची प्रक्रिया चालू आहे. या ठिकाणी लहान-मोठे उद्योग लवकरच येत आहेत. त्याची प्रक्रिया चालू असून या औद्योगिक क्षेत्राच्या वस्तूस्थितीची माहिती घेतल्यास निर्माण झालेले गैरसमज दूर होतील, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
आडाळी औद्योगिक क्षेत्रात भूखंड वाटप करून उद्योग चालू करण्यात यावेत, स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळावा, या मागणीसाठी २० ऑगस्ट या दिवशी आडाळी ते बांदा असा महामोर्चा काढण्यात येणार आहे. आडाळी औद्योगिक क्षेत्र चालू न होण्यास स्थानिक आमदार उत्तरदायी असल्याचा आरोप काही जण करत आहेत. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री तथा येथील आमदार दीपक केसरकर याविषयी म्हणाले, ‘‘अनेक छोट्या-मोठ्या आस्थापनांनी भूमी आरक्षित केली आहे. सध्या राजकीय दृष्टीने अपप्रचार चालू आहे. २४ आस्थापनांना येथे भूमी दिलेली आहे. त्याची पुढील प्रक्रिया चालू आहे. शासकीय स्तरावर सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत काही कालावधी लागतो. येथील भूमीचे वाटप केले जात नाही, हा आरोप चुकीचा आहे. आडाळी येथे भूमीचे दर अधिक असल्याने ते अल्प करण्याची मागणी करण्यात आली आहे. आडाळी येथे चालू असलेल्या प्रक्रियेची माहिती घेतली, तर तेथे काय स्थिती आहे ?, हे संबंधितांच्या लक्षात येईल.’’
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात आडाळी एमआयडीसीमध्ये प्रकल्प येत नसल्याची तक्रार होत होती. याबाबत मी केंद्रीय मंत्री मा. श्री. श्रीपाद नाईक साहेब यांच्या आयुष मंत्रालयाला ५० एकर जागा प्रकल्पासाठी दिली. ३२५ लोकांना रोजगार देणारा २१० कोटींचा प्रकल्प हा १३ जुलैला आडाळी… pic.twitter.com/47wRyl8lo8
— Uday Samant (@samant_uday) August 19, 2023
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आडाळी औद्योगिक क्षेत्राविषयी माहिती देतांना सांगितले की, केंद्रीय आयुष मंत्रालयाला प्रकल्पासाठी ५० एकर भूमी दिली आहे. २१० कोटी रुपयांचा प्रकल्प येत असून त्यासाठी भूमी दिली आहे. अन्य २४ भूखंडांचे वाटप झालेले आहे. ‘आडाळी येथील औद्योगिक क्षेत्रातील भूमीचे अधिक असलेले दर अल्प करण्यात यावेत’, अशी मागणी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. ती लवकरच मान्य केली जाणार आहे. पायाभूत सुविधांसाठी २२ कोटी रुपये दिले आहेत. आडाळीत कोणतेही काम थांबलेले नाही. त्यामुळे चुकीच्या माहितीच्या आधारे मित्रपक्षांनी पत्रकार परिषद घेऊन आडाळीच्या स्थितीविषयी माहिती देण्यापूर्वी आपल्याशी संपर्क करणे आवश्यक होते. आडाळीत येत्या काही काळात अनेक चांगले प्रकल्प आलेले दिसतील.