दोडामार्ग – तालुक्यातील आडाळी औद्योगिक क्षेत्रातील भूखंड उद्योजकांना वितरित करून हे क्षेत्र कार्यान्वित करण्यात महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एम्.आय.डी.सी.) आणि राज्यशासन यांच्याकडून होणार्या विलंबाच्या निषेधार्थ रविवार, २० ऑगस्ट या दिवशी ‘आडाळी ते बांदा’ असा ८ कि.मी.चा लक्षवेधी मोर्चा (लाँग मार्च) आयोजित करण्यात आला आहे. हा मोर्चा जरी बांद्यापर्यंत असला, तरी तो मंत्रालयावरील प्रतिकात्मक मोर्चा आहे, अशी माहिती आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास कृती समितीच्या वतीने सरपंच पराग गावकर यांनी दिली.
आडाळी येथे ७२० एकर क्षेत्रात वर्ष २०१३ मध्ये औद्योगिक विकास महामंडळाकडून औद्योगिक क्षेत्रास मान्यता मिळाली. या प्रकल्पाचे स्वागत करून त्यानंतर वर्षभरातच स्थानिकांनी त्यांच्या भूमी महामंडळाकडे हस्तांतर केल्या; मात्र महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, शासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे आजही येथील औद्योगिक क्षेत्रातील भूखंडांचे वाटप उद्योजकांना झालेले नाही. यासाठी आडाळी स्थानिक औद्योगिक क्षेत्र विकास कृती समिती आणि ‘घुंगुरकाठी’ संस्था संचलित आडाळी एम्.आय.डी.सी. स्थानिक लोकाधिकार संरक्षण समिती यांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला; मात्र एक दशक संपले, तरी औद्योगिक क्षेत्र गती घेण्याची कोणतीच चिन्हे नसल्याने या विषयाकडे शासनाचे आणि सर्व संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, असे सरपंच गावकर यांनी सांगितले.
मोर्चाला भाजपचा पाठिंबा
सावंतवाडी – आडाळी येथे औद्योगिक क्षेत्र चालू व्हावे, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २० ऑगस्ट या दिवशी काढण्यात येणार्या मोर्चाला भाजपचा पाठिंबा असल्याचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी स्पष्ट केले आहे.
मोर्चाला पाठिंबा हा भाजपचा दिखाऊपणा ! – वैभव नाईक, आमदार, शिवसेना (ठाकरे गट)
दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एम्.आय.डी.सी.मध्ये उद्योग, व्यवसाय चालू न होण्यास भाजपच उत्तरदायी आहे.
राज्य आणि केंद्र येथे भाजपचेच सरकार आहे आणि मंत्री आहेत; मग ही एम्.आय.डी.सी. चालू का होत नाही ? स्वत:चे अपयश झाकण्यासाठी आता या एम्.आय.डी.सी.विषयी काढण्यात येणार्या मोर्चाला पाठिंबा देण्याचे नाटक भाजप करत आहे, अशी टीका शिवसेना (ठाकरे गट) आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.