सांगली, १८ ऑगस्ट (वार्ता.) – स्थायी समिती सभापती झाल्यावर जिल्हा नियोजन समिती, पालकमंत्री, आमदार-खासदार यांचा निधी, महापालिकेचा निधी, तसेच अन्य विविध प्रकारचा निधी आम्ही मिळवण्यात यशस्वी झालो. घनकचरा व्यवस्थापन, सुसज्ज नाट्यगृह, वारणा उद़्भव पाणी योजना यांसह विविध योजनांची कार्यवाही करत स्थायी समितीच्या माध्यमातून वर्षभरात ६०० कोटी रुपयांची विकासकामे करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. १९ ऑगस्टला सांगली महापालिकेतील सर्व सदस्यांचा कार्यकाल संपत असून शेवटच्या स्थायी समिती सभेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
१. घनकचरा प्रकल्प आम्ही मार्गी लावण्यात यशस्वी झालो असून मिरज येथील काम ८५ टक्के, तर सांगली येथील काम ६५ टक्के पूर्ण झाले आहे. येणार्या ३ मासांत उर्वरित काम पूर्ण होईल.
२. काळी खण विकासासाठी ९ कोटी रुपये प्रस्तावित असून लवकरच महापालिका क्षेत्रात ५ सहस्र झाडे आम्ही लावणार आहोत.
३. जामवाडी परिसरात युवकांसाठी ५ कोटी रुपये व्यय करून अद्ययावत् व्यायामशाळा उभारण्यात येत आहे. यात कुस्तीचा आखाडा, स्वतंत्र पुरुष-महिला यांच्यासाठी स्वतंत्र व्यायामशाळा, सर्व अत्याधुनिक यंत्रणा यांचा समावेश आहे. आज युवक व्यसनमुक्त होऊन त्यांचा राष्ट्रकार्यात सहभाग वाढावा, हा आमचा संकल्प आहे.
४. सांगलीत भव्य नाट्यगृह उभारणीसाठी २५ कोटी रुपये संमत झाले असून त्याचा शासकीय अध्यादेशही निघालेला आहे.
५. आमचा कार्यकाल जरी संपला असला, तरी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही २४ घंटे उपलब्ध असून केलेल्या विकासकामांद्वारेच भाजपची सत्ता महापालिकेत परत येईल, असा आमचा विश्वास आहे.