विद्यार्थ्यांसमोर हाणामारी करणारे शिक्षक मुलांवर काय संस्कार करणार ?
सातारा, १८ ऑगस्ट (वार्ता.) – म्हसवड येथील माने वस्तीवरील शाळेत शशिकांत खाडे आणि विठ्ठल बागल या २ शिक्षकांमध्येच हाणामारी झाली. विद्यार्थ्यांसमोर शाळेच्या आवारातच हा प्रकार घडला.
शशिकांत खाडे हे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नीचा पळशी येथे कापड व्यवसाय आहे. शशिकांत खाडे हे माण तालुक्यात अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गणवेश पुरवठा करतात. स्वातंत्र्यदिन जवळ आला असल्याने प्रत्येक शाळा नवीन गणवेश खरेदी करत आहे. शशिकांत खाडे हे या शाळेत गणवेश विक्रीसाठी गेले होते. तेव्हा गणवेश खरेदीवरून शशिकांत खाडे आणि विठ्ठल बागल यांच्यामध्ये वाद झाला. हा वाद टोकाला जाऊन याचे रूपांतर हाणामारीत झाले.
शशिकांत खाडे यांना शिक्षण विभागाने शालेय गणवेश विक्रेता म्हणून अनुमती दिली आहे का ? शालेय वेळेत कपडे विकण्यास अनुमती दिली आहे का ? शाळा मुख्यालय सोडण्याची अनुमती खाडे यांना कुणी दिली ? खाडे हे कुणाच्या सांगण्यावरून कपडे विकण्याचा व्यवसाय कधीपासून करत आहेत ? याविषयी शिक्षण विभागाला माहिती आहे का ? उपशिक्षक खाडे यांच्यावर जिल्हा परिषद शिक्षण विभाग कोणती कारवाई करणार आहे ? असे अनेक प्रश्न पालक उपस्थित करत आहेत.