नागपूर येथील श्री गणेशमूर्तींना गुजरात, छत्तीसगडसह मध्‍यप्रदेशातूनही मागणी !

शाडूच्‍या श्री गणेशमूर्तींना अधिक मागणी !

नागपूर – मुंबई आणि पेण येथील श्री गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणात नागपूर येथे येतात. आखीव रेखीव आणि आकर्षक असल्‍याने त्‍या मूर्ती भाविक विकत घेतात; मात्र गेल्‍या काही वर्षांत शहरात शाडूच्‍या (मातीच्‍या) मूर्तींची मागणी वाढली आहे, अशी माहिती पारंपरिक मूर्तीकार आणि हस्‍तकला कारागीर संघाचे महाराष्‍ट्र प्रदेश अध्‍यक्ष सुरेश पाठक यांनी १३ ऑगस्‍ट या दिवशी येथे दिली. केवळ नागपूरच नव्‍हे, तर येथून मुंबई, छत्रपती संभाजीनगर, गुजरात, छत्तीसगड, मध्‍यप्रदेश या राज्‍यांतही या गणेशमूर्तींची मागणी आहे.

५-६ लाख गणेशमूर्ती सिद्ध !

प्रतिवर्षी नागपूर येथे ५ ते ६ लाख गणेशमूर्ती सिद्ध होतात. प्राप्‍त माहितीनुसार, कृत्रिम तलाव आणि टँक येथे विसर्जित होणार्‍या गणेशमूर्तींची संख्‍या २ लाख ५२ सहस्र इतकी आहे. काही भाविक घरीच गणेशमूर्तींचे विसर्जन करतात. अशा भाविकांची संख्‍या १ लाखाच्‍या आसपास धरल्‍यास प्रतिवर्षी गणेशोत्‍सवाच्‍या काळात लहान आकारातील ३ लाख ५० सहस्र गणेशमूर्तींची विक्री होते, असे मूर्तीकारांचे म्‍हणणे आहे.