राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेच्‍या कोल्‍हापूर जिल्‍ह्यात धाडी : तिघेजण कह्यात !

प्रतीकात्मक छायाचित्र

कोल्‍हापूर – ‘पी.एफ्.आय.’(पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडिया) या आतंकवादी संघटनेच्‍या  संपर्कात असल्‍याच्‍या संशयावरून राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) कोल्‍हापूर शहरासह इचलकरंजी, हुपरी येथे धाडी घातल्‍या. यात तिघांना कह्यात घेतल्‍याचे समजते. या तिघांकडून महत्त्वाची कागदपत्रे, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्‍तू असे साहित्‍य कह्यात घेण्‍यात आले आहे. या कारवाईविषयी प्रचंड गुप्‍तता पाळण्‍यात आली असून स्‍थानिक यंत्रणांनाही या कारवाईची फारशी माहिती नव्‍हती. स्‍वातंत्र्यदिनाच्‍या १ दिवस अगोदर ही कारवाई झाल्‍याने मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वीही राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेचे पथक कोल्‍हापूर जिल्‍ह्यात येऊन गेले होते.

या संदर्भात राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) केंद्रीय स्‍तरावर एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. यात‘पी.एफ्.आय.’चे जाळे नष्‍ट करण्‍यासाठी ५ राज्‍यांत १४ ठिकाणी धाडी घालण्‍यात आल्‍या. यात कोल्‍हापूर जिल्‍ह्याचाही समावेश असल्‍याची माहिती देण्‍यात आली आहे. देशात धार्मिक तणाव निर्माण करून हिंसाचार भडकावण्‍याचा आणि समाजात फूट पाडण्‍याचा संघटनेचा कट होता, असे एन्.आय.ए.च्‍या अधिकार्‍यांनी सांगितले.