फाळणीच्‍या वेळी बळी गेलेल्‍या भारतवासियांचे श्रद्धापूर्वक स्‍मरण करा ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘विभाजन विभीषिका स्‍मृतीदिन’ देशभरात साजरा !

नवी देहली – स्‍वातंत्र्याच्‍या अमृतमहोत्‍सवाच्‍या कार्यक्रमांच्‍या अंतर्गत १४ ऑगस्‍ट या दिवशी सरकारच्‍या वतीने ‘विभाजन विभीषिका स्‍मृतीदिन’ साजरा केला गेला. १४ ऑगस्‍ट १९४७ या दिवशी भारताची फाळणी झाली. विस्‍थापनाच्‍या वेदना झेलणार्‍या लोकांच्‍या स्‍मरणासाठी हा दिवस साजरा करण्‍यात आला. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्‍स’वरून पोस्‍ट (ट्‍वीट) केले की, हा दिवस त्‍या भारतवासियांचे श्रद्धापूर्वक स्‍मरण करण्‍यासाठी आहे, ज्‍यांचे जीवन देशाच्‍या फाळणीच्‍या वेळी बळी गेले. हा दिवस त्‍या लोकांचे कष्‍ट आणि संघर्ष यांचेही स्‍मरण करवतो, ज्‍यांना विस्‍थापनाचा दंश झेलण्‍यास बाध्‍य व्‍हावे लागले होते. अशा सर्व लोकांना माझे शत शत नमन !

राजधानीत या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाला विस्‍थापित कुटुंबांना निमंत्रित करण्‍यात आले होते. फाळणीच्‍या वेळी प्राण गेलेल्‍या लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्‍यात आली. असेे कार्यक्रम देशभरात आयोजित करण्‍यात आले. या वेळी फाळणीशी संबंधित चलचित्रे, तसेच ऐतिहासिक कागदपत्रांचे प्रदर्शन भरवण्‍यात आले होते. यामध्‍ये फाळणीशी संबंधित पुस्‍तकांचे प्रदर्शनही लावण्‍यात आले होते.