चिनी (‘फेंगशुई’) वास्‍तूशास्‍त्र चांगले कि भारतीय वास्‍तूशास्‍त्र श्रेष्‍ठ ?

१२ ऑगस्‍ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘फेंगशुई’मध्‍ये सतत निरनिराळे प्रयोग करावे लागणे, भारतीय वास्‍तूशास्‍त्रामध्‍ये निश्‍चित नियम असणे, आणि ‘फेंगशुई’ तज्ञ १५ ते २० दिवसांत सिद्ध कसे होतात ?’, यांविषयीचा भाग वाचला. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/490964.html

७. लाकूड हे मूलभूत तत्त्व कसे ?

फेंगशुईमध्‍ये लाकूड हे ५ तत्त्वांपैकी एक मूलभूत तत्त्व मानले आहे. ‘लाकूड हे मूलभूत तत्त्व कसे काय होऊ शकते ?’, माती, पाणी आणि अग्‍नी ही मूलभूत तत्त्वे आहेत. लाकूड बनण्‍याकरता मुळात झाड पहिजे. हे झाड उत्‍पन्‍न होण्‍याकरता बीज पाहिजे. ज्‍यापासून पुढे अंकूर फुटून मग त्‍याचे झाड, म्‍हणजेच लाकूड सिद्ध होते. माती कशापासून सिद्ध होत नाही, ती अस्‍तित्‍वात आहेच. पाणीही अगोदरपासून आहेच; परंतु लाकडाचे तसे नाही. झाड नसेल, तर लाकूड मिळणार नाही आणि बिजांकुराविना झाड नाही. ज्‍याचे अस्‍तित्‍व दुसर्‍यावर अवलंबून आहे, ते मूलभूत तत्त्व होऊच शकत नाही; परंतु चिनी तत्त्ववेत्ता ‘कन्‍फ्‍युशिअस’ने त्‍याच्‍या कल्‍पनाविलासाप्रमाणे मूलभूत तत्त्वे सांगितली आणि ती तेव्‍हापासून कार्यवाहीत आली.

८. काही राजांनी त्‍यांच्‍या बौद्धिक कुवतीप्रमाणे केलेले असणे, त्‍यात निश्‍चित तत्त्व असे काही नसणे

इसवी सन ६७२ पूर्वी काऊ नावाच्‍या राज्‍यशासनामध्‍ये आणि नंतर राजा वॉन अन् राजकुमार टॅन यांनी त्‍यांच्‍या बौद्धिक क्षमतेप्रमाणे निरनिराळे अर्थ लावले. त्‍याप्रमाणे मग ८ प्रकारच्‍या रेखांकित आकृत्‍या सिद्ध केल्‍या. नंतर त्‍या ६४ झाल्‍या आणि मग त्‍यांचे निरनिराळे अर्थ लावण्‍यास आरंभ झाला. त्‍यामागे निश्‍चित तत्त्व असे काही नाही. या रेखा कुणी कधी वाढवल्‍या, याचा थांगपत्ता नाही. ‘६४ का ? १२८ का नको ?’, याचेही उत्तर नाही.

९. सध्‍या चिनी वस्‍तूंचे पेव फुटलेले असणे 

९ अ. आरंभीला ७ प्रकारच्‍या वस्‍तू असून आता त्‍यामध्‍ये वाढ झालेली असणे : वर्ष १९६० ते ८० च्‍या कालावधीत निरनिराळ्‍या चिनी वस्‍तू उपाय म्‍हणून केवळ ७ प्रकारच्‍या होत्‍या; परंतु त्‍या वस्‍तूंच्‍या वाढीसह किमतीमध्‍येही वाढ झाली, उदा. प्रथम पोकळ पितळी नळ्‍यांचे विंडचाईम होते. आता त्‍यामध्‍ये प्रत्‍येक जण निरनिराळे पालट करू लागले आहेत. ९ पोकळ नळ्‍या, ७ जाड नळ्‍या, ५ जाड नळ्‍या आणि ४ पोकळ नळ्‍या, खाली लोंबता लोलक किंवा गोल चकती इत्‍यादी अनेक प्रकारची विंडचाईम मिळतात. काहींमध्‍ये पितळेची तार, काहींमध्‍ये लाल दोरा, तर काहींमध्‍ये लाल आणि पिवळा दोरा इत्‍यादी.

९ आ. ‘बेडूक कुठे ठेवायचा ?’, याविषयीही निश्‍चिती नसणे : ‘बेडूक कुठे ठेवायचा ?’, याविषयीही निश्‍चिती नाही. काही म्‍हणतात, ‘दारासमोर ठेवा’, काही सांगतात, ‘छोट्या टेबलावर ठेवा’, काहींचे म्‍हणणे ‘कोपर्‍यात ठेवा’, म्‍हणजे तो दरवाजाकडे ‘पैसे येतात कि नाही ?’, ते पाहिल !’ अरे वा ! काय पण सल्ला आहे हा ! एक जण म्‍हणते, ‘दिवसा दरवाजाकडे तोंड करून ठेवा आणि रात्री त्‍याचे तोंड घराच्‍या आत करून ठेवा. ९ बेडूक ठेवल्‍यास चांगले म्‍हणे.’ एकाने घरामध्‍ये मुंगूस ठेवायला सांगितले आहे. पांढरा वाघ ठेवा, म्‍हणजे तो तुम्‍हाला धैर्य देईल. ‘म्‍हणे, मुलांचे वाढदिवस साजरे करू नका, ते वाईट असते. केवळ वृद्ध माणसांचे ६० नंतर वाढदिवस साजरे करावेत’, असे फेंगशुई तज्ञाचे म्‍हणणे आहे. १० व्‍या शतकामध्‍ये लुईहाइ नावाच्‍या एका मंत्र्याने ३ पायाच्‍या बेडकाची ‘टूम’ काढली; कारण तो म्‍हणे प्रत्‍यक्ष (डायरेक्‍ट) आकाशातून पडला आहे.

९ इ. पुरुषाने कोपर्‍यामध्‍ये लाल चोचीची कोंबडी ठेवावी आणि बाई असेल, तर तिने तिच्‍या खोलीच्‍या कोपर्‍यामध्‍ये कोंबडा ठेवावा.

९ ई. हॅन राज्‍यकर्त्‍यांनी काढलेली नाणी गळ्‍यात बांधण्‍यास सांगणे : इसवी सनापूर्वी २०६ व्‍या वर्षी हॅन राज्‍यकर्त्‍यांनी जी नाणी काढली, ती ९ नाणी गळ्‍यात बांधली, तर पुष्‍कळ संपत्ती मिळते म्‍हणे.

वरील सर्व प्रकारांना आज या सुशिक्षित उच्‍च आणि उच्‍च मध्‍यम वर्गियांना, विज्ञापनांमुळे मान्‍यता प्राप्‍त होते. प्रत्‍यक्षात काय घडले ? हे तेच जाणोत; पण पैसे खर्च करून वस्‍तू विकत घेणे चालू आहे. असे अनेक प्रकार अलिकडे चिनी वास्‍तूशास्‍त्राच्‍या नावाखाली चाललेले पहावयास मिळतात.

१०. भारतीय पद्धतीची सुचिन्‍हे, प्राणी आणि चालीरिती यांचा उपयोग होत असल्‍याचे आढळणे

अगदी अलिकडच्‍या पुस्‍तकांमध्‍ये, तर चिनी वास्‍तूशास्‍त्राच्‍या नावाखाली चक्‍क भारतीय पद्धतीची सुचिन्‍हे, प्राणी आणि चालीरिती यांचा उपयोग करत असल्‍याचे आढळते. भारतीय वास्‍तूशास्‍त्रामध्‍ये ज्‍याप्रमाणे सहस्रो वर्षांपूर्वी लिहून ठेवले आहे की, ‘जे सुमंगल, नयनरम्‍य चित्र वाटेल, ते घरात लावावे. युद्ध चालू असल्‍याचे दृश्‍य आणि हिंस्र पशूंची चित्रे इत्‍यादी लावू नये. अगदी याच गोष्‍टी अलिकडच्‍या फेंगशुर्ईच्‍या पुस्‍तकांमध्‍ये आढळतात. अगदी अलिकडील पुस्‍तकात, तर ‘गायीचे चित्र चांगले’, असे चक्‍क लिहिले आहे.

भारतीय वास्‍तूशास्‍त्रात सांगितले, तेव्‍हा कुणी ऐकले नाही. लहान मुलांच्‍या गळ्‍यात काळा दोरा मंत्रून अथवा एखादे देवाचे पदक करून लावावे; म्‍हणून सांगितले जात असे. ते आपली माणसे ऐकत नाहीत. त्‍यांची चेष्‍टा करतात; पण आता चिनी नाणी दोर्‍यात बांधून लहान मुलांच्‍या गळ्‍यात अडकवायला ते सिद्ध होतात.

११. भारतीय वास्‍तूशास्‍त्राचेच श्रेष्‍ठत्‍व

११ अ. तुलनात्‍मकरित्‍या भारतीय वास्‍तूशास्‍त्र श्रेष्‍ठ असणे : तौलनिकदृष्‍ट्या दोन्‍ही शास्‍त्रांचा अभ्‍यास केला, तर अखेरीस ‘भारतीय वास्‍तूशास्‍त्रच सर्वतोपरी श्रेष्‍ठ आहे’, असे आढळले. सहस्रो वर्षांपूर्वी जे नियम भारतीय वास्‍तूशास्‍त्रात सांगितलेले आहेत, तेच आजही सर्वत्र लागू आहेत आणि पुढे भविष्‍यातही तेच अस्‍तित्‍वात रहाणार आहेत. ते नियम शाश्‍वत आहेत, चिरंतन आहेत; कारण ते ज्ञान आहे. पृथ्‍वीतलावरील कोणत्‍याही मानवाला ते लागू आहेत. कोणत्‍याही प्रकारच्‍या घरात ते लागू आहेत. कोणत्‍याही वर्षी तेच नियम तंतोतंत लागू पडतील. वर्षाप्रमाणे घरातील रचना पालटावी लागत नाही. ‘घराच्‍या दरवाजाप्रमाणे फर्निचर, रंग आणि रचना पालटावी लागणे’, हा प्रकार नाही. घरात कितीही माणसे असली, तरी नियम तेच. कुटुंबातील प्रत्‍येक व्‍यक्‍तीच्‍या जन्‍मदिनांकानुसार घरातील खोल्‍यांची रचना सतत पालटावी लागत नाही.

११ आ. वास्‍तूशास्‍त्रातील नियमानुसार घर बांधल्‍यास त्‍याचा लाभ होत असणे : वास्‍तूशास्‍त्रातील नियमाप्रमाणे नवीन घर बांधले, तर कायम आनंदच मिळेल. अधिकाधिक आनंद, स्‍वास्‍थ्‍य, समाधान समृद्धी मिळवायची असेल, तर निरनिराळ्‍या चांगल्‍या प्रकारांनी आपण घर सुशोभित करू शकतो; पण नाही केले; म्‍हणून काहीच हानी होत नाही. एवढेच नव्‍हे, तर आपण सध्‍या रहात असलेल्‍या जागेमध्‍येसुद्धा थोडीफार रचना पालटली, तर चांगली फळे मिळू शकतात. ‘पुष्‍कळ तोडफोड करावी लागते, व्‍यय करावा लागतो’, हा अपसमज पसरवला गेला आहे. ज्‍या शास्‍त्रामध्‍ये ईश्‍वराला स्‍थान नाही, ते चिनी वास्‍तूशास्‍त्र चांगले कि आपले भारतीय वास्‍तूशास्‍त्र चांगले ? हे प्रत्‍येकाने ठरवायचे आहे. ‘भारतीय वास्‍तूशास्‍त्रामध्‍ये प्रथम मंदिर, मग बाकीची रचना असते. कोणताही भारतीय मनुष्‍य सर्व नीट वाचल्‍यानंतर आणि समजून घेतल्‍यावर भारतीय वास्‍तूशास्‍त्र चांगले, सर्वोत्‍कृष्‍ट आहे’, असेच म्‍हणेल. याबद्दल मला निश्‍चिती आहे.’

– अधिवक्ता अरविंद वझे

(साभार : ‘आध्‍यात्‍मिक ॐ चैतन्‍य’, मे २००४)