पुणे येथील वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठात्याला लाच घेतांना अटक !

डॉ. आशिष बंगिनवार

पुणे – ‘महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट’च्या अंतर्गत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ. आशिष बंगिनवार यांना लाच घेतांना पकडले आहे. १६ लाख रुपयांच्या लाचेतील पहिला हप्ता म्हणून १० लाख रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. डॉ. बंगिनवार यांना १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चौकशीमधून महापालिकेने स्थापन केलेल्या वैद्यकीय ट्रस्टमधील काही विश्‍वस्तांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचे अन्वेषण चालू आहे. या प्रकरणी एका ४९ वर्षीय आधुनिक वैद्यांनी तक्रार दिली आहे.

बंगिनवार यांनी तक्रारदाराकडे त्यांच्या मुलाच्या महाविद्यालयातील प्रवेशासाठी प्रतिवर्षाची शासनमान्य विहीत फी २२ लाख ५० सहस्र रुपये व्यतिरिक्त १६ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. बंगिनवार हे ३ वर्षांपूर्वी गुजरातमधील सिल्वासा येथे वैद्यकीय प्राध्यापक म्हणून रुजू होते. त्यानंतर त्यांची पुण्यात अधिष्ठाता म्हणून नियुक्ती झाली.

अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यामागे कुणाचा हात होता ? याचे अन्वेषण चालू आहे.