शाश्‍वत आनंदप्राप्तीसाठी साधना आणि स्वभावदोष निर्मूलन आवश्यक ! – कु. मिल्की अग्रवाल, गोवा

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने मॉरिशसमध्ये ‘ऑनलाईन’ शोधनिबंध सादर : ‘धकाधकीच्या जगात शाश्‍वत आनंद मिळवणे’

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. शॉन क्लार्क हे आहेत सहलेखक !

फोंडा (गोवा) – नियमित आध्यात्मिक साधना केल्यास आणि स्वभावदोष अन् अहं निर्मूलनासाठी सतत प्रयत्न केल्यास आपल्या सर्व समस्यांवर मात करता येते आणि आपल्याला शाश्‍वत सुखाची म्हणजेच आनंदाची अनुभूती घेता येते, असे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या कु. मिल्की अग्रवाल यांनी सांगितले. मॉरिशस येथे नुकतेच ‘इमोशनल वेल बिइंग इन्स्टिट्यूट’ने (इ.डब्ल्यू.बी.आय.ने) ‘मॉरिशस मुक्त विद्यापीठ’ आणि ‘रॅदुइ आणि मिडलसेक्स युनिव्हर्सिटी, मॉरिशस’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘फर्स्ट इमोशनल वेल बिइंग इंटरनॅशनल कॉन्फरन्स’मध्ये (इ.डब्ल्यू.बी.आय.सी.मध्ये) त्या बोलत होत्या. कु. मिल्की अग्रवाल यांनी ‘धकाधकीच्या जगात शाश्‍वत आनंद मिळवणे : आध्यात्मिक संशोधनातून अंतर्दृष्टी’ या विषयावर शोधनिबंध ‘ऑनलाईन’ सादर केला. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक, तर संशोधन गटाचे सदस्य श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) हे सहलेखक आहेत.

कु. मिल्की अग्रवाल

कु. मिल्की अग्रवाल यांनी पुढे सांगितले की, शाश्‍वत आनंद मिळवण्यासाठी आपण ३ टप्प्यांतील उपायांचा श्रद्धापूर्वक अवलंब प्रतिदिन करू शकतो. प्रथम ईश्‍वराचा नामजप करणे. ‘जी.डी.व्ही. बायोवेल’ या वैज्ञानिक उपकरणाचा वापर करून प्रयोगामध्ये ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ हा नामजप केवळ ४० मिनिटे केल्यानंतर कुंडलिनी चक्र एका रेषेत येऊन प्रचंड सकारात्मक ऊर्जा स्वत:कडे आकर्षित झाल्याचे आढळून आले. दुसरे म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सिद्ध केलेली स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया ! तिसरे म्हणजे प्रतिदिन खडे मिठाच्या पाण्यात १५ मिनिटे पाय बुडवून बसण्याचे उपाय केल्याने शरिरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यास साहाय्य होते.

या वेळी संशोधनाचा निष्कर्ष सांगतांना कु. मिल्की अग्रवाल म्हणाल्या की, एखाद्याने अध्यात्मशास्त्रानुसार प्रामाणिकपणे साधना केली, तर कालांतराने त्याच्या जीवनातील दु:ख आणि तणाव न्यून होतो अन् त्या व्यक्तीला शांती, तसेच आनंद मिळण्यास साहाय्य होते.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे आंतरराष्ट्रीय परिषदेतील हे ८९ वे सादरीकरण होते. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने आतापर्यंत १०७ परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. त्यातील १३ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सर्वोत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार प्राप्त केले आहेत.