सातारा जिल्‍ह्यात १ सहस्र ६६८ नागरिकांना डोळ्‍यांचा संसर्ग !

डोळ्‍यांचा संसर्ग

सातारा, १० ऑगस्‍ट (वार्ता.) – सध्‍या डोळे येण्‍याची साथ चालू आहे. हा आजार गंभीर स्‍वरूपाचा नसला, तरी वेदना टाळण्‍यासाठी त्‍वरेने आधुनिक वैद्यांकडून औषधोपचार करून घेतल्‍यास हा आजार टाळता येतो. रुग्‍णांना डोळे येण्‍याची लक्षणे आढळून आल्‍यास त्‍यांनी त्‍वरित आरोग्‍य विभागाशी संपर्क साधावा. आतापर्यंत १ सहस्र ६६८ नागरिकांना डोळ्‍यांचा संसर्ग झाला असून त्‍यांपैकी ७२५ रुग्‍ण बरे झाले आहेत, अशी माहिती जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.

डॉ. खलिपे पुढे म्‍हणाले, ‘‘डोळे आलेल्‍या रुग्‍णांनी आपला जनसंपर्क अल्‍प करावा. संसर्गाने हा रोग होत असल्‍यामुळे सतत हात धुणे आवश्‍यक आहे. शाळा, वसतीगृहे, अनाथालय अशा संस्‍थात्‍मक ठिकाणी कुणाचे डोळे आले असतील, तर अशांना वेगळे ठेवायला हवे. ग्रामस्‍तरावर ग्रामीण रुग्‍णालय, प्राथमिक आरोग्‍य केंद्रांमध्‍ये यासाठी पूर्णत: विनामूल्‍य उपचार उपलब्‍ध आहेत, तसेच नागरिकांनी कोणत्‍याही अफवांवर विश्‍वास न ठेवता शंकानिरसन करून घेण्‍यासाठी जवळच्‍या आरोग्‍य विभागाशी संपर्क साधावा.’’