‘सध्या वाराणसीमध्ये ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण चालू आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या (ए.एस्.आय.च्या) चमूकडून हे सर्वेक्षण केले जात आहे. या चमूचे नेतृत्व भारतीय पुरातत्व सवेर्र्क्षणाचे अतिरिक्त महासंचालक आलोक त्रिपाठी करत असून ते अतिशय प्रसिद्ध आहेत. पुरातन गोष्टींवरील रहस्यांचा पडदा दूर करणे, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. आतापर्यंत त्यांनी अशा अनेक मोहिमा राबवल्या. ते आसाम विद्यापीठ सिलचर येथे इतिहासाचे प्राध्यापकही राहिले आहेत. ते ‘अंडरवॉटर आर्कियोलॉजिकल विंग’चे अध्यक्ष होते. त्यांनी प्राचीन भुयारांच्या (गुफांच्या) मार्गाने होणार्या व्यापारी मार्गांचाही अभ्यास केला आहे.
त्यांना लहानपणापासूनच पुरातत्वशास्त्रज्ञ व्हायचे होते. जुन्या गोष्टी जाणून घेण्याची आणि त्यावर संशोधन करण्याची त्यांना आवड होती. त्यामुळे इतिहासाचे प्राध्यापक होऊनही डॉ. त्रिपाठी पुरातत्व विभागामध्ये रुजू झाले. त्यांनी तमिळनाडूमधील मल्लापुरम्, अरिकामेडू, गुजरातमधील द्वारका, महाराष्ट्रातील एलिफंटा इत्यादींविषयी मोठे संशोधन केले आहे. त्यांच्या मते, समुद्रात अनेक मोठी गुपिते दडलेली आहेत, जी आपल्याला त्या काळातील कथा उलगडतात. पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणून त्यांना लक्षद्वीपमधील बंगाराम बेटावरील समुद्रात राजकुमारी रॉयल जहाजाचे अवशेष सापडले आहेत.