राजेश क्षीरसागर यांच्‍याकडून महापालिका अधिकारी धारेवर कचरा व्‍यवस्‍थापनासाठी दिलेला निधी कुठे जातो ? – राजेश क्षीरसागर

लाईन बझार येथील झूम प्रकल्‍पाची पहाणी करतांना श्री. राजेश क्षीरसागर, महापालिकेचे अधिकारी आणि कार्यकर्ते

कोल्‍हापूर – शहरातील कचरा उठावाचा प्रश्‍न गंभीर असून कचरा उठावामध्‍ये अनियमितता असल्‍याने नागरिकांचे आरोग्‍य धोक्‍यात आले आहे. शहरात साथीच्‍या आजारांनी नागरिकांचे आरोग्‍य धोक्‍यात आले असतांना प्रशासन तात्‍पुरती मलमपट्टी करण्‍याचे काम करत आहे का ? केंद्र आणि राज्‍य सरकारकडून कचरा निर्गतीकरण करण्‍यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी येत आहे. तरीही कचर्‍याचे डोंगर न्‍यून न होता वाढत असल्‍याची स्‍थिती निर्माण झाली आहे. निधी खर्चूनही कामात सुधारणा नाही, तर कचरा व्‍यवस्‍थापनासाठी दिलेला निधी कुठे जातो ? असा प्रश्‍न राज्‍य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्‍यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी उपस्‍थित केला.

शहरातील कचरा उठाव, झूम प्रकल्‍पातील कचर्‍याचे वाढणारे डोंगर आणि कचर्‍यावर होणारी प्रकिया यांविषयी श्री. राजेश क्षीरसागर यांनी लाईन बझार येथील झूम प्रकल्‍पाची पहाणी केली. या वेळी स्‍थानिक नागरिकांनी महापालिकेच्‍या भोंगळ कारभाराच्‍या अनेक तक्रारी या वेळी मांडल्‍या. कचरा उठावाची ३० वाहने बंद असल्‍याचे निदर्शनास आले. यावर आक्रमक होत श्री. राजेश क्षीरसागर यांनी मनपा अधिकार्‍यांना धारेवर धरत खडेबोल सुनावले.

श्री. राजेश क्षीरसागर पुढे म्‍हणाले, ‘‘उठाव केलेल्‍या कचर्‍यावर वेळेत प्रक्रिया होत नसल्‍याने कचर्‍याचे डोंगर उभे रहात आहेत. कोल्‍हापूर येथील कचर्‍याची स्‍थिती मुंबई, देहली या सारख्‍या शहरांसारखी झाली आहे. कचरा उठावातील अनियमिततेमुळे शहरात साथीचे रोग पसरत आहेत. तीन दिवसांपूर्वी १८ वर्षाच्‍या तरुणाचा डेंग्‍यूनेे मृत्‍यू झाला, ही अत्‍यंत दुर्दैवी घटना आहे. १५ दिवसांनी याठिकाणी पुन्‍हा पहाणी करण्‍यात येणार आहे. तोपर्यंत कामात सुधारणा झाल्‍याचे दिसून आले पाहिजे. अन्‍यथा गय केली जाणार नाही. संबधितांवर कारवाई करण्‍यात येईल.’’