उच्‍च लोकांतून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेले दैवी बालक, तसेच कुमार आणि किशोर वयीन साधक यांच्‍यामध्‍ये होणारे पालट अन् त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये प्रतिवर्षी लिखित स्‍वरूपात ‘जिल्‍हा समन्‍वयकां’कडे पाठवा !

बालसाधकांचे पालक, जिल्‍हा समन्‍वयक आणि जिल्‍हासेवक यांना सूचना

पालकांनी दैवी बालकांमधील पालट वेळोेवेळी अभ्‍यासण्‍यासाठी, तसेच जिल्‍हा समन्‍वयक आणि जिल्‍हासेवक यांनी ‘वरील सूत्रांनुसार बालसाधकांचे लिखाण येत आहे ना ?’, हे पहाण्‍यासाठी येथे दिलेली सर्व सूत्रे आपल्‍या संग्रही ठेवावीत.

‘हिंदु राष्‍ट्र’ पुढे चालवण्‍यासाठी ईश्‍वराने ‘दैवी बालकां’चे नियोजन केले आहे. हे दैवी जीव उच्‍च स्‍वर्गलोक ते महर्लोक यांसारख्‍या उच्‍च लोकांतून पृथ्‍वीवर जन्‍माला आले आहेत, तर काही जनलोकातून या भूतलावर जन्‍माला आले आहेत. सनातनने आतापर्यंत १२०० हून अधिक दैवी जिवांना ओळखले आहे. या बालसाधकांची आध्‍यात्मिक पातळी ५० टक्‍क्‍यांहून अधिक असते. (दैवी बालकांच्‍या वयानुसार त्‍यांचे ‘बालगट – जन्‍म ते ५ वर्षे’, ‘कुमारवयीन गट – ६ ते १२ वर्षे’ आणि ‘किशोरवयीन गट – १३ ते १८ वर्षे’, असे गट केलेले आहेत.)

‘अशा दैवी जिवांच्‍या पुढील आध्‍यात्मिक प्रवासाच्‍या संदर्भात संशोधन करता यावे’, याकरता त्‍यांच्‍यामध्‍ये होणार्‍या आध्‍यात्मिक आणि मानसिक पालटांची नोंद करणे आवश्‍यक आहे. यासाठी दैवी बालकांच्‍या पालकांनी प्रतिवर्षी आपल्‍या मुलाच्‍या वाढदिवसाच्‍या १ मास अगोदर ‘आपल्‍या मुलामध्‍ये वर्षभरात कोणते पालट झाले ?’, तसेच ‘त्‍याची वेगळी काही गुणवैशिष्‍ट्ये जाणवत आहेत का ?’, याविषयीचे लिखाण जिल्‍ह्यातील ‘जिल्‍हा समन्‍वयकां’कडे लिहून पाठवावे. हे लिखाण पालकांनी रामनाथी, गोवा येथील संकलन विभागाकडे थेट पाठवू नयेत.


१. पालकांनी दैवी बालकांमधील पालट आणि गुणवैशिष्‍ट्ये पुढील सूत्रांच्‍या आधारे लिहून पाठवावेत.

अ. वर्षभरात मुलाचे वाढलेले किंवा न्‍यून झालेले गुण आणि स्‍वभावदोष दर्शवणारे प्रसंग

आ. मुलांच्‍या आध्‍यात्मिक त्रासामध्‍ये झालेला पालट (पूर्वी त्रास होता. आता तो न्‍यून झाला किंवा वाढला. त्रास न्‍यून झाला असल्‍यास कोणते आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय केले ?)

इ. मुलाची साधनेप्रती ओढ वाढली किंवा न्‍यून झाली, हे दर्शवणारे प्रसंग

ई. प्रतिदिन मुलाकडून होणारे साधनेचे प्रयत्न, उदा. नामजप, प्रार्थना, कृतज्ञता, भाववृद्धीसाठी केले जाणारे प्रयत्न, चुकांचे निरीक्षण आणि लिखाण, क्षमायाचना इत्‍यादी.

उ. इतरांच्‍या चुकांचे निरीक्षण, तसेच अयोग्‍य कृती थांबवण्‍यासाठी मुलाकडून केले जाणारे प्रयत्न

ऊ. कुटुंबियांना घरकामांत किंवा सेवेत साहाय्‍य करण्‍याची वृत्ती, जिल्‍हा किंवा केंद्र येथील समष्‍टी सेवांत सहभागी होण्‍याची आवड

ए. मुलाचा सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती असलेला भाव किंवा श्रद्धा व्‍यक्‍त होणारे काही प्रसंग

ऐ. मुलाकडून होणार्‍या धर्माचरणाच्‍या कृती, तसेच धर्माभिमान दर्शवणारे प्रसंग

ओ. मुलाला आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती

२. पालकांनी ‘आपल्‍या मुलाच्‍या आध्‍यात्मिक प्रगतीसाठी स्‍वतः कोणते प्रयत्न केले ?’ ‘प्रयत्न करण्‍यात ते कुठे न्‍यून पडले’, याविषयीही ‘जिल्‍हा समन्‍वयकां’कडे लिहून द्यावे.

३. दैवी बालक १८ वर्षांचा होईपर्यंत अशा प्रकारचे लिखाण प्रतिवर्षी लिहून पाठवावे.

४. छायाचित्रे पाठवणे

पालकांनी या सूत्रांसमवेत बालकाची सध्‍याची (गेल्‍या २ मासांतील) छायाचित्रे पाठवावीत. ही छायाचित्रे सात्त्विक वेशभूषा केलेली आणि हसरी असावीत.

थोडक्‍यात, हे लिखाण, म्‍हणजे त्‍या दैवी जिवाच्‍या साधनेचा आलेख असेल ! ज्‍यातून ‘त्‍याच्‍या आध्‍यात्मिक प्रगतीमध्‍ये होणारे चढ-उतार आणि त्‍याला कारणीभूत घटक’ यांचा अभ्‍यास करता येईल.

टीप : या लिखाणाचा संग्रह केवळ संशोधनासाठी (अभ्‍यासासाठी) करत असल्‍यामुळे हे सर्व लिखाण प्रतिवर्षी त्‍या मुलाच्‍या वाढदिवसाच्‍या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये प्रसिद्ध केली जाणार नाहीत. त्‍यातील काही सूत्रे वैशिष्‍ट्यपूर्ण असल्‍यास ती जरूर प्रसिद्ध केली जातील !’

– संकलन विभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.७.२०२३)