प्रभु श्रीरामांच्या प्रेरणेने जीवन चारित्र्यसंपन्न होईल ! – स्वामी स्वरूपानंद सरस्वती

श्रीरामकथा ज्ञानयज्ञाची भक्तीपूर्ण वातावरणात सांगता

नगर – प्रभु श्रीरामांची प्रेरणा, शक्ती आणि सामर्थ्य जीवनात निर्माण झाले, तर जीवन चारित्र्यसंपन्न, शुद्ध, निर्मळ होईल, असे प.पू. स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी सांगितले. येथील बडिसाजन मंगल कार्यालयात स्व. सौ. ताराबाई श्रीनिवास झंवर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या श्रीरामकथा ज्ञानयज्ञाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. गणेश झंवर यांनी संपूर्ण ज्ञानयज्ञ सोहळ्याचे सूत्रसंचलन करून आभार मानतांना वर्ष २०११ ते २०२३ च्या दरम्यान आमच्या कुटुंबाची आर्थिक उन्नती प.पू. स्वामीजी आणि प.पू. माताजी यांच्या आशीर्वादानेच झाली. आईची माताजींवर श्रद्धा होती. आईच्या इच्छेसाठीच माताजींच्या श्रीरामकथा ज्ञानयज्ञाचे आयोजन केले, असे सांगितले.

प.पू. स्वामी स्वरूपानंद सरस्वती पुढे म्हणाले, ‘‘श्रीरामकथांच्या प्रेरणेने समाज आपोआप बदलायला लागेल. कुटुंबव्यवस्था आपोआप बदलायला लागेल. परमश्रद्धेय माताजींच्या अमृतवाणीमधून श्रीरामकथांचे श्रवण केलेले सर्वजण भाग्यवान आहेत. माताजी शक्तीचा आणि अनुभूतींचा अविष्कार आहेत. श्रीरामकथेचे श्रवण करतांना आपणास तेजःपुंज प्रकाश स्वरूपात प्रभु श्रीरामांचे दर्शन घडलेच असेल. आपल्या प्रत्येकाच्या हृदयात भाव-भावनांचा निरनिराळा आविष्कार झाला असणार. भक्तीची परिसीमा काय असावी ? सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी समर्पणाची भावना काय असावी ? परमतत्वाची अवस्था काय असावी ? हे अनुभवतांना भक्त परमेश्वरस्वरूप होत होता. प्रत्येकाच्या अंतरंगात दिव्य अनुभूती येत होती. ज्यामध्ये स्वतःला सर्वजण विसरून जात होते. स्वतःचे शरीर, अस्तित्व, अहंकार, ममकाराचे भान गळून पडत होते. श्रीराममय अवस्थेत सर्वजण आनंदाचे डोही आनंद तरंगचा आनंद घेत होते. हृदयात निवास करणार्‍या मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामाची प्रत्येकाने अखंडपणाने अनुभूती घेतली. अतिदिव्य, अतिभव्य, दुर्मिळ, दुर्लभ असा हा नऊ दिवसांचा सोहळा झाला. सुंदरकाण्डाने सांगता परिपूर्ण झाली.’’