अधिवेशन संपण्याच्या १ दिवसआधी विरोधी पक्षनेत्याची निवड !

काँग्रेसचे नेते श्री. विजय वडेट्टीवार

मुंबई, ३ ऑगस्ट (वार्ता.) – राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळाले आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली. विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन ४ ऑगस्ट या दिवशी संपणार आहे. अधिवेशन संपण्याच्या एक दिवसआधी विरोधी पक्षाची निवड करण्यात आली.

यापूर्वीचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पदाचे त्यागपत्र देऊन ते सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे महाविकास आघाडीला विरोधी पक्षाची निवड करावी लागली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ३ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत ही घोषणा केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेते यांनी विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षाच्या आसनावर बसवले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी वडेट्टीवार यांना शुभेच्छा दिल्या. विजय वडेट्टीवार यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले.