सदस्यांच्या वागण्यात सुधारणा होत नाही, तोपर्यंत लोकसभेचे कामकाज चालवण्यास नकार ! – लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला

संसदेतील सततच्या गदारोळानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचा निर्णय !

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला

नवी देहली – संसदेत मणीपूरच्या हिंसाचारावरून विरोधी पक्षांकडून गेले ९ दिवस गदारोळ घातला जात असतांना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी १० व्या दिवशी लोकसभेच्या कामकाज चालवण्यास नकार दिला. ‘जोपर्यंत संसदेच्या मानसन्मानानुसार सदस्य वागणार नाहीत, तोपर्यंत लोकसभेचे कामकाज चालवणार नाही’, अशी त्यांनी चेतावणी दिली. संसदेचा मान राखणे, हे सर्वांचे सामूहिक दायित्व आहे. काही सदस्यांचे वागणे परंपरेच्या विरुद्ध आहे.

संसदेचे कामकाज २ ऑगस्टला सकाळी चालू झाल्यावर लगेच गदारोळ चालू झाल्याने १५ मिनिटानंतरच दुपारी २ पर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले.

संपादकीय भूमिका

अशा निर्णयामुळे गदारोळ घालणार्‍या सदस्यांवर काहीही परिणाम होणार नाही. याऐवजी लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारात गदारोळ करणार्‍या सदस्यांना संसदेबाहेर काढण्याचे, निलंबित करण्याचे आदी निर्णय घेणे अपेक्षित आहे. वर्गात मुले दंगा करू लागल्यास शिक्षक त्यांना वर्गाबाहेर ओणवे उभे करतात आणि शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात ! असा कठोर निर्णय अध्यक्षांनी घ्यावा, असेच नागरिकांना वाटते !