अतीवृष्टीमुळे ८ दिवस बंद होती वाहतूक
वैभववाडी – सिंधुदुर्ग-कोल्हापूर राज्य मार्गावरील कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगा येथील पूल अतीवृष्टीमुळे बंद करण्यात आला होता; मात्र आता हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने वाहतूक पूर्ववत् चालू करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे भोगावती नदी धोक्याच्या पातळीवरून वहात होती. त्यामुळे बालिंगा पुलावरून पाणी वहात होते. त्यामुळे २३ जुलैपासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. आता पावसाने उसंत घेतल्यामुळे मार्गावर आलेले पुराचे पाणी ओसरले आहे. त्यामुळे ३१ जुलैपासून या पुलावरून वाहतूक चालू करण्यात आली आहे. पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली, तर वाहतूक बंद करावी लागू शकते. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता आर्.बी. शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.