सध्या चालू असलेल्या चातुर्मासाच्या निमित्ताने !
‘आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील देवशयनी एकादशीपासून (आषाढी एकादशीपासून) चातुर्मासाच्या व्रताचा आरंभ करतात. काही जण व्यास पौर्णिमेपासून (गुरुपौर्णिमेपासून) या व्रताचा आरंभ करतात. शास्त्रवचनानुसार आषाढ मासाच्या देवशयनी एकादशीच्या दिवशी सूर्य जेव्हा मिथुन राशीमध्ये असतो, तेव्हा भगवान मधुसूदन (श्रीविष्णु) शयन करतात आणि कार्तिक मासाच्या उत्थान एकादशीच्या दिवशी सूर्याने पुन्हा तूळ राशीमध्ये प्रवेश केल्यावर भगवान उठतात. या ४ मासांमध्ये वैष्णव कठोर व्रतांचे पालन करतात. स्वतःचा अधिकाधिक वेळ भगवत कथा, हरिकीर्तन आणि हरिस्मरण यांमध्ये व्यतित करतात. असे सांगितले जाते, ‘या कालावधीमध्ये केलेली भागवतकथा, चिंतन, स्मरण, पूजापाठ, पुराणांचे वाचन आणि जप सर्व काही अक्षय्य होते.’
मांसाहारी आणि मद्य पिणारी व्यक्तीही या ४ मासांतील एक मास या अयोग्य सवयींना सोडते. त्यामुळे नकळत पुण्य मिळून जाते. यावरून आपण जाणू शकतो की, भगवंत किती दयाळू आहे. त्यांच्याकडे जाण्यासाठी त्यांनी अनेक मार्ग दिले असून त्या मार्गावर अनेक सुविधा दिल्या आहेत. जेणेकरून आपल्याला त्याच्याकडे लवकरात लवकर पोचता येईल.
१. चातुर्मासात कोणती भगवद़्भक्ती कराल ?
‘चातुर्मास’ हा भगवंताकडे जाणारा जवळचा मार्ग आहे. कोणती भगवद़्भक्ती केल्याने लवकर फळ मिळते, यांची काही उदाहरणे खाली दिली आहेत.
अ. जो कुणी भगवद़्नामाचा जप करतो, त्यास नेहमीपेक्षा शतपटींनी लाभ होतो.
आ. जो कुणी या चारही मासांमध्ये पळसाच्या पानाच्या पत्रावळीवर जेवतो, तो रूपवान होऊन त्यास सर्व भोगसामुग्री प्राप्त होते.
इ. जो मौन पाळून भोजन करतो, त्याच्या आज्ञेचे कुणीच उल्लंघन करू शकत नाही.
ई. जी व्यक्ती प्रतिदिन भगवान श्रीकृष्णाच्या समोर बसून लोकांना शास्त्र सांगेल, ती नक्कीच वैकुंठप्राप्ती करील.
उ. एकादशीच्या पालनाने आणि पत्रावळीवर भोजन केल्याने मिळणारे फळ एकसारखेच आहे, असे सांगितले जाते.
ऊ. चारही मासांमध्ये जो कुणी मध, गूळ, पालेभाज्या, दही-दूध या वस्तूंचा त्याग करतो आणि भगवंताचे नामस्मरण करतो, त्याला मोक्षप्राप्ती नक्कीच होते.
ए. जी व्यक्ती ४ मास स्वतः स्वयंपाक सिद्ध करून भगवंताला अर्पण करून खाते, तिला उत्तम गती मिळते.
ऐ. भगवंत झोपी गेल्यानंतर जो कुणी त्याचा नामजप आणि गुणलीलांचे गुणगान करतो, त्यास अगणित फळ प्राप्त होते.
या सर्व गोष्टी भगवद़्भजनात रुची नसणार्या लोकांसाठीही आहेत आणि भगवद़्कथेत संलग्न असणार्यांसाठी अधिकच लाभदायक आहेत. शास्त्रामध्ये वर्णन केलेली प्रत्येक गोष्ट आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी अतिशय उपयुक्त आहे.
२. चातुर्मासातील मासांमध्ये कोणते पदार्थ वर्ज्य करावेत ?
अ. बहुधा पहिल्या मासामध्ये वैष्णवजन भगवंताच्या प्रसन्नतेसाठी पालेभाज्या खात नाहीत. तसे पहाता पहिल्या मासामध्ये पालेभाज्या खाऊ नयेत; कारण आषाढातील पावसाच्या पाण्यामध्ये भूमीवरील सर्व कचरा मिसळला जातो आणि त्याच पाण्यावर पालेभाज्या येतात. त्याच वेळी अनेक कृमी (जंत), कीटक आणि विषाणू यांंनी पालेभाज्यांचा आश्रय घेतलेला असतो. त्यामुळे अशा पालेभाज्या खाणे, म्हणजे रोगांना आमंत्रण देण्यासारखेच आहे.
आ. दुसर्या मासामध्ये नारळी पौर्णिमेपासून वैष्णवजन भगवंताच्या प्रसन्नतेसाठी दही वर्ज्य करतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहिल्यास या मासामध्ये दही न खाणेच योग्य आहे. या मासापासूनच वर्षा ऋतू आरंभ होतो. त्यामुळे अग्नीमांद्य (अग्नी मंदावलेला) आणि अपचन होते. शरिरातील वात वाढतो. दही हे पोटाला थंड करणारे आणि शरिरातील वात वाढवणारे असल्याने या ऋतूमध्ये दही न खाणेच योग्य आहे.
इ. तिसर्या मासामध्ये भाद्रपद पौर्णिमेपासून वैष्णवजन भगवंताच्या प्रसन्नतेसाठी दुधाचा त्याग करतात. तेही योग्यच आहे; कारण या मासामध्ये बहुतेक गायींनी वासरांना जन्म दिलेला असतो. त्यामुळे या मासात गायीच्या दुधावर वासरांचाच अधिकार असतो. त्यामुळे या मासात दूध न पिणेच योग्य असते.
ई. चौथ्या म्हणजेच कार्तिक मासामध्ये शरद पौर्णिमेपासून वैष्णव उडीद वर्ज्य करतात. वैष्णवांसाठी हा मास, म्हणजे पर्वणीच असते. याला ‘ऊर्जाव्रत’ म्हटले जाते.’
(साभार : ‘गोडसेवादी’, जुलै २०१६)
अन्य नियतकालिकांमधील लेख घेण्यामागील ‘सनातन प्रभात’ची भूमिका !दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये अन्य नियतकालिकांमधील लेख प्रसिद्ध केले जातात. ‘समाजाचे उद़्बोधन करणारी, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात नाविन्यपूर्ण माहिती मिळावी, तसेच समाजात चांगल्या माहितीचा प्रसार व्हावा’, या उद्देशाने हे समाजोपयोगी लिखाण प्रसिद्ध केले जाते’, याची वाचकांनी नोंद घ्यावी. – संपादक |