आचरण आणि जागृती यांद्वारे सनातन संस्‍कृती वाढेल ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

‘श्री रामधाम रामायण मंडळ ट्रस्‍ट’च्‍या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

श्री. आनंद जाखोटिया

भीलवाडा (राजस्‍थान) – मंदिरात आपण देवाचे दर्शन घेतो किंवा देवाची आरती करतो; परंतु आपण भगवंताचा अनुभव घेतो का ? शास्‍त्रानुसार आचरण आणि भाव यांमुळे आपल्‍याला अनुभूती येते. भगवंताला नमस्‍कार करण्‍यापासून ते त्‍याची आरती भावपूर्ण कशी करावी ? तसेच अन्‍य धर्माचरण यांसाठी हिंदु जनजागृती समिती शास्‍त्रशुद्ध परिभाषेत धर्मशिक्षण देण्‍याचा प्रयत्न करत आहे. ‘धर्म समजून घ्‍यावा, आचरणात आणावा आणि त्‍याचा अनुभव घ्‍या’, ही त्रिसूत्री पुढे नेण्‍याची आवश्‍यकता आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे मध्‍यप्रदेश आणि राजस्‍थान या राज्‍यांचे समन्‍वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी केले. ते श्री रामधाम रामायण मंडळ ट्रस्‍ट’द्वारे आयोजित रामधन सत्‍संग भवनातील शिव महापुराण प्रवचनासाठी उपस्‍थित भाविकांना मार्गदर्शन करत होेते.

या वेळी व्‍यासपिठावर ‘मार्कंडेय संन्‍यास आश्रमा’चे आदरणीय ब्रह्मचार दया चैतन्‍यजी महाराज उपस्‍थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘भारत विकास परिषदे’चे राजस्‍थान मध्‍य प्रांताचे अध्‍यक्ष श्री. गोविंद प्रसादजी सोडाणी यांनी केले. या वेळी श्री. आनंद जाखोटिया यांनी ‘शास्‍त्रानुसार देवाला नमस्‍कार कसा करावा ? आरती कशी करावी ? वाढदिवस तिथीनुसार साजरा का करावा ? इत्‍यादी विषयांवर उपस्‍थित लोकांचे प्रबोधन केले. या वेळी लावण्‍यात आलेल्‍या ग्रंथप्रदर्शनाला भाविकांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद लाभला.