देशात वर्ष २०१९ ते २०२१ कालावधीत १३ लाखांहून अधिक मुली आणि महिला बेपत्ता !

नवी देहली – देशात वर्ष २०१९ ते २०२१ या ३ वर्षांत १३ लाख १३ सहस्रांहून अधिक मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत. १८ वर्षांहून अधिक वयाच्या १० लाख ६१ सहस्र ६४८ महिला आणि त्याहून अल्प वयाच्या २ लाख ५१ सहस्र ४३० मुली वर्ष २०१९ ते २०२१ या कालावधीत देशभरात बेपत्ता झाल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने गेल्या आठवड्यात संसदेत सादर केलेल्या आकडेवारीत दिली. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने ही आकडेवारी दिली आहे. देशभरातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना केल्या असल्याचीही माहिती सरकारने या वेळी दिली. यात लैंगिक अत्याचारांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठी ‘गुन्हेगारी कायदा (सुधारणा) कायदा २०१३’ अंमलात आणण्याचा समावेश असल्याचे सरकारने सांगितले.

१. सर्वाधिक मुली आणि महिला मध्यप्रदेश, त्यानंतर बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांतून बेपत्ता झाल्या आहेत. महाराष्ट्रातून १ लाख ७८ सहस्र ४०० महिला आणि १३ सहस्र ३३ मुली बेपत्ता झाल्या आहेत.

२. केंद्रशासित प्रदेशांपैकी देहलीमध्ये वर्ष २०१९ ते २०२१ या कालावधीत ६१ सहस्र ५४ महिला आणि २२ सहस्र ९१९ मुली बेपत्ता झाल्या आहेत.

संपादकीय भूमिका

  • हे पोलीस आणि सर्व सरकारे यांना लज्जास्पद !
  • यामध्ये हिंदूंची संख्या किती आहे ?, तसेच ‘यांपैकी किती जणींना आतंकवादी संघटनेत भरती करण्यासाठी नेण्यात आले ?, हेही सरकारने उघड करायला हवे !