‘ईश्वरप्राप्ती’ हेच मनुष्य जन्माचे मूलभूत ध्येय आहे. त्यासाठी साधकांनी याच जन्मात तळमळीने साधना करून आध्यात्मिक उन्नती करून घेणे आवश्यक आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी श्री गुरूंची कृपा, तसेच मार्गदर्शन यांची नितांत आवश्यकता आहे. श्री गुरूंमुळेच आपल्याला जीवनाकडे पहाण्याची योग्य दृष्टी मिळते, तसेच स्वबोध होतो. आता आपत्काळ चालू झाला आहे. तिसरे महायुद्ध अत्यंत विनाशकारी असणार आहे. त्यासाठी आपण सिद्ध असणे आवश्यक आहे. आपत्काळातून तरून जाण्यासाठी साधनाच आवश्यक आहे. त्या दृष्टीने जलद आध्यात्मिक उन्नती होण्यात येणार्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना समजून घेऊया.
१. साधकांचा साधना करण्यापेक्षा कार्य करण्याकडे अधिक ओढा असणे
१ अ. कार्य नाही, तर साधना मोक्षप्राप्ती करून देते ! : आपल्याला कार्य मोक्षाला नेत नाही, तर त्या कार्याच्या माध्यमातून आपल्याकडून होत असलेली साधना आपल्याला मोक्षप्राप्ती करून देते. साधकांनी त्या दृष्टीने प्रयत्न करणे अपेक्षित आहे.
१ आ. कृती करतांना स्वतःमध्ये ईश्वरी गुणांचा विकास व्हायला हवा ! : साधकांचे कोणतीही कृती करतांना ‘त्या कृतीतून आपली साधना होत आहे ना ?’, याकडे लक्ष असणे आवश्यक आहे. आपण करत असलेल्या कार्यातून आपल्यामध्ये ईश्वरी गुणांचा विकास होण्याऐवजी आपल्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे पोषण होत असेल, तर आपल्या साधनेची हानी होऊ शकते. यासाठी आपण सतत सतर्क असायला हवे.
१ इ. सेवा करतांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी मनापासून प्रयत्न करावेत ! : ‘साधकांनी ‘सेवा’ हे स्वतःला ईश्वराशी जोडण्याचे माध्यम आहे’, याची जाणीव ठेवावी. साधकांनी सेवा करतांना स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन अन् ईश्वरी गुणांचा विकास होण्यासाठी स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी मनापासून प्रयत्न करावेत.
१ ई. साधकांनी प्रतिदिन मनाचा आढावा घ्यावा. साधकांनी ‘साधनेसाठी प्रयत्न होत आहोत ना ?’, हे पहायला हवे. साधकांचे साधनेचे प्रयत्न होत नसल्यास त्यांनी प्रायश्चित्त घ्यायला हवे.
१ उ. साधकांनी ‘वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती’ हाच कार्याचा केंद्रबिंदू आहे’, हे लक्षात ठेवावे.
१ ऊ. साधनेविषयी गांभीर्य निर्माण करणारे प.पू. गुरुदेवांचे बोल ! : प.पू. गुरुदेव सांगतात, ‘‘शहामृगाला जेव्हा कळते की, आता संकट येणार आहे, तेव्हा ते वाळूत डोके खुपसून बसते. त्याला वाटते की, ‘संकट येईल आणि निघून जाईल’; पण तसे न होता ते संकट त्या शहामृगाचाच नाश करते. आपल्या सर्वांची स्थिती तशी होऊ नये, यासाठी आता साधना करण्याविना पर्याय नाही. त्यामुळे साधनेला आजच नव्हे, तर आताच आरंभ करा !’’
२. व्यष्टी साधनेचे नियोजन नसणे
अ. साधकांनी सेवेचे नियोजन करतांना ‘त्या सेवेतून माझी साधना होत आहे ना ? सेवा गुरुदेवांना अपेक्षित अशी होत आहे ना ?’, याविषयी चिंतन करावे.
आ. साधकांनी ‘सेवा करतांना भाव कसा ठेवायचा ? सेवा परिपूर्ण होण्यासाठी संभाव्य चुकांचा (कृती आणि मन यांच्या स्तरांवरील) अभ्यास करणे, वेळोवेळी प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करणे, स्वतःवरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढणे’ इत्यादी साधनेसाठीची सूत्रे ठरवून घेऊन त्याप्रमाणे कृती करावी.
इ. काही साधकांमध्ये गुरुकार्य साधना म्हणून करण्याची ओढ अल्प असते. त्यांचे व्यष्टी साधनेचे नियोजन नसल्याने गांभीर्याच्या अभावी त्यांच्याकडून कृतीही होत नाहीत. कृती होण्यासाठी विचार, तसेच नियोजन असणे आवश्यक आहे. त्यासाठी साधकांनी सेवेच्या नियोजनासह सेवेतून साधना होण्यासाठी करायच्या कृतींचेही नियोजन करणे आवश्यक आहे.
३. साधनेच्या प्रयत्नांत सातत्य नसणे
अ. कलियुगात साधना करणे अतिशय कठीण आहे. साधकांचा साधना करण्याचा दृढ निश्चय असायला हवा. साधकांनी साधनेच्या प्रयत्नांत सातत्य ठेवण्यासाठी प्रारंभीच्या टप्प्यात चिकाटीने, निग्रहाने आणि सतर्क राहून प्रयत्न करायला हवेत.
आ. साधनेचे प्रयत्न सातत्याने होण्यासाठी साधकांनी देवाचे साहाय्य घ्यायला हवे. त्यासाठी शरणागतभावाने सतत प्रार्थना करणे आणि आपले क्रियमाण शंभर टक्के वापरणे आवश्यक आहे.
इ. ईश्वरप्राप्तीसाठी सातत्याने करायचे प्रयत्न, म्हणजे साधना आहे. ईश्वरप्राप्तीसाठी कधीतरी प्रयत्न करणे, म्हणजे छंद जोपासल्यासारखे आहे.
ई. साधकांनी ‘विचारणे, ऐकणे, स्वीकारणे, शिकणे आणि कृती करणे’ ही पंचसूत्रे आचरणात आणून ‘सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करावा : साधकांनी सेवा स्वतःच्या प्रकृतीप्रमाणे न करता ‘विचारणे, ऐकणे, स्वीकारणे, शिकणे आणि कृती करणे’ ही पंचसूत्रे आचरणात आणून ‘सेवा परिपूर्ण कशी करता येईल ?’, यासाठी प्रयत्न करायला हवा. साधकांकडून बर्याच वेळा सेवा सांगकाम्यासारखी बहिर्मुखतेने केली जाते. परिणामी ते कार्य होते आणि त्यातून साधकांना आनंदही मिळत नाही.
उ. साधकांनी सेवा साधना म्हणून परिपूर्ण आणि भावपूर्ण केल्यास त्यातून त्यांना आनंद मिळतो. सेवेतून आनंद मिळाल्यास साधनेच्या प्रयत्नांत सातत्य रहाते.
४. साधना होण्यासाठी तळमळ अल्प असणे
अ. ‘ईश्वरप्राप्तीसाठी काहीही करायची सिद्धता असणे’, ही खरी तळमळ आहे.
आ. तळमळीला साधनेत ८० टक्के महत्त्व आहे. जेवढी साधनेची तळमळ अधिक, तेवढा आपल्या कार्यातील ईश्वराचा सहभाग अधिक असतो. जेवढा ईश्वराचा सहभाग अधिक, तेवढी आपली सेवा परिपूर्ण होते. त्या सेवेतून आपल्याला आनंद मिळतो आणि आपली साधनाही होते.
इ. साधकांनी ‘माझी ईश्वरप्राप्तीची तळमळ वाढू दे’, अशी प्रार्थना सतत करावी. आपण साधना होण्यासाठी चिकाटीने प्रयत्न केल्यास आपल्याला देव साहाय्य करत असल्याच्या अनुभूती येतात आणि त्यामुळे आपल्यातील तळमळ वाढते.
५. साधनेच्या प्रयत्नांमध्ये अल्पसंतुष्टता नको !
अ. सेवेच्या माध्यमातून साधना होण्यासाठी प्रत्येकाचे थोडेफार प्रयत्न होत असतात; परंतु सेवा परिपूर्ण होण्यासाठी आणि ध्येयपूर्तीसाठी ते प्रयत्न पुरेसे नसतात. जे प्रयत्न होतात, त्यावरच साधक समाधानी असतात. त्यामुळे साधकांकडून अपेक्षित असे प्रयत्न होत नाहीत.
आ. आपल्याला सर्वशक्तीमान आणि सर्वगुणसंपन्न ईश्वराशी एकरूप व्हायचे आहे. त्यासाठी आपण कितीही प्रयत्न केले, तरीही ते अल्पच आहेत. साधनेत ‘अल्पसंतुष्टता’ हा मोठा अडथळा ठरतो. साधकांनी अल्पसंतुष्ट न रहाता सेवा परिपूर्ण आणि भावपूर्ण करण्यासाठी सतत परिश्रम करायला हवेत.
६. भावाच्या स्तरावरील प्रयत्न अल्प होणे
अ. साधकांनी प्रत्येक कृती भक्तीभावाने केली पाहिजे. आपल्यात देवाप्रती भाव असेल, तर देव आपल्याला प्रत्येक परिस्थितीत शिकवतो, मार्गदर्शन करतो, साहाय्य करतो आणि स्थिर ठेवतो.
आ. आपण सातत्याने भावाच्या स्तरावर साधनेचे प्रयत्न केल्यास आपली आध्यात्मिक पातळी वाढते. त्यामुळे साधकांनी प्रत्येक प्रसंगात देवाचे अस्तित्व अनुभवण्याचा प्रयत्न करायला हवा.
इ. साधकांनी ‘कोणत्या कारणांमुळे स्वतःची भावस्थिती ढासळते’, याचा अभ्यास करायला हवा. साधकांनी ‘भावस्थिती टिकून रहाण्यासाठी काय उपाय करायचे ?’, याचे चिंतन करावे.
ई. ‘भाव तेथे देव !’, असे एक सुवचन आहे. त्यामुळे साधकांनी कोरडेपणाने सेवा न करता भावाच्या स्तरावर सेवा करायला हवी. साधकामध्ये भाव असेल, तर त्याला कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक आणि स्थिर रहाता येते.
७. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया, तसेच गुणसंवर्धन प्रक्रिया योग्य प्रकारे राबवली न जाणे
सध्याच्या काळात जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया गांभीर्याने राबवणे आवश्यक आहे.
अ. या प्रक्रियेत ‘स्वतःच्या चुका शोधणे, त्या सारणीत लिहिणे, चुका सांगणे, स्वयंसूचना घेणे, क्षमायाचना करणे, प्रायश्चित्त घेणे’, ही सूत्रे अंतर्भूत आहेत.
आ. आपली प्रत्येक चूक आपल्याला ईश्वरापासून दूर नेते. साधकांनी ‘मला माझ्या चुका शोधायच्या आहेत’, हा विचार सतत ठेवायला हवा. साधकांनी या प्रक्रियेचे महत्त्व सतत मनावर बिंबवायला हवे.
इ. साधकांनी साधकांच्या बैठकीत स्वत:च्या चुका सांगायला हव्यात. चुका सांगितल्यामुळे चुकांप्रतीचे गांभीर्य, तसेच त्याविषयीची खंत आपल्यात अनेक पटींनी निर्माण होते. आपला अहंभाव न्यून होतो आणि आपल्या चुकीतून अन्य साधकांना शिकायला मिळते. तसेच चुका सांगितल्यामुळे आपली व्यष्टी आणि समष्टी साधना होते.
ई. साधक या प्रक्रियेमध्ये स्वयंसूचना देतात. साधकांनी स्वयंसूचना देण्यासह कृतीच्या स्तरावर प्रयत्न करणेही महत्त्वाचे आहे.
उ. साधकांनी सेवेच्या माध्यमातून, तसेच सहसाधकांशी समन्वय करतांना ‘आपले वागणे-बोलणे यांतून कुठे अहंची लक्षणे जाणवतात का ?’, याचे चिंतन करायला हवे.
ऊ. साधकांना मनातील लहान-सहान विचार पकडता यायला हवेत. त्यामुळे साधकांना त्यांच्यातील स्वभावदोष आणि अहं यांची तीव्रता लक्षात येते.
ए. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया गुरुदेवांना अपेक्षित अशी होण्यासाठी साधकांनी सतत अंतर्मुख असायला हवे. ‘मी साधनेच्या दृष्टीने काय करायलाहवे ?’, असा विचार करणे, म्हणजे ‘अंतर्मुखता’ आणि ‘इतरांनी साधना म्हणून काय करायला हवे ?’, हे सतत पहाणे, म्हणजे बहिर्मुखता आहे.
८. ‘अपेक्षा करणे’ या अहंच्या पैलूवर मात करण्यासाठी अल्प प्रयत्न होणे
आपल्या अपेक्षेप्रमाणे किंवा मनाप्रमाणे झाले नाही की, लगेच आपल्या मनात प्रतिक्रिया येतात. त्यामुळे आपल्या मनाची शांती आणि स्थिरता नष्ट होते.
अ. ‘प्रतिक्रिया येणे’, हे कमकुवत मनाचे लक्षण आहे.
आ. देव प्रीतीस्वरूप आहे. आपल्याला देवत्वाच्या दिशेने जायचे असेल, तर आपल्यातही प्रेमभाव आणि प्रीती हे गुण वाढवायला हवेत. साधकांशी जवळीक साधायला हवी.
इ. ‘निरपेक्षता’ ही स्थिती आहे. ‘समजूतदारपणा आणि परिस्थिती स्वीकारणे’ हे गुण वाढले की, निरपेक्षतेने वागता येते.
९. परिस्थिती न स्वीकारणे
अ. साधक कौटुंबिक आणि आर्थिक अडचणी, तसेच प्रकृती अस्वास्थ्य (शारीरिक आजार) यांमध्ये अडकतात. ‘साधकांनी त्यावर योग्य ती उपाययोजना करून साधनेवर लक्ष केंद्रित करून ईश्वरप्राप्ती कशी करू शकतो ?’, हे पहाणे आवश्यक आहे. याला ‘ईश्वरात अडकणे, म्हणजे ईश्वराच्या अनुसंधानात रहाणे’, असे म्हणू शकतो.
आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सांगतात, ‘परिस्थिती स्वीकारणे’ ही सर्वोत्तम साधना आहे !’
इ. ईश्वरेच्छेने प्रत्येक प्रसंग घडत असल्याने तो आनंदाने स्वीकारणे आवश्यक आहे. साधकांनी ‘त्यातून प्रारब्ध अल्प होत आहे’, असा दृष्टीकोन ठेवावा.
१०. कौटुंबिक, तसेच मायेतील विचार यांचे प्रमाण वाढणे
अ. अनेक साधकांच्या मनात सध्या मायेतील विचार येत आहेत. काही जणांना संसाराची काळजी वाटते. काही जणांना ‘व्यवहाराकडे अधिक लक्ष द्यावे’, असे वाटते. काही जण वाईट शक्तींच्या त्रासामुळे, तर काही जण स्वभावदोषांमुळे मायेकडे खेचले जात असल्याचे लक्षात आले आहे. साधकांनी श्री गुरुचरणांवर दृढ श्रद्धा ठेवून या विचारांवर मात करावी.
आ. मायेचे विचार हे मायावीच असतात. त्यातून आपल्याला शाश्वत आनंद कधीच मिळणार नाही. ‘साधनेत टिकून रहाणे’, हे सध्याच्या काळात अत्यंत आवश्यक आहे.
इ. मनात येणारे विचार उत्तरदायी साधक किंवा संत यांना मनमोकळेपणाने सांगतांना साधकांची केवळ सांगण्याची भूमिका नको, तर त्यांची अशा विचारांवर मात करण्यासाठी साधनेच्या स्तरावर विचार करून ‘प्रयत्न कसे करायला हवेत ?’, हे जाणून घेण्याची भूमिका हवी.
ई. ‘साधकांचा जन्म ईश्वरप्राप्तीसाठी आहे. मायेत रममाण होऊन आयुष्य व्यर्थ घालवण्यासाठी नव्हे’, हे ध्यानात घेऊन ईश्वरप्राप्तीसाठी अथक परिश्रम करूया.
११. स्वतःला पालटण्यासाठी संघर्ष करण्याची सिद्धता अल्प असणे
अ. स्वतःला पालटण्यासाठी ‘संघर्ष करणे’, हे साधनेतील एक महत्त्वाचे अंग आहे.
आ. आपल्या क्रियमाणावर, म्हणजेच प्रयत्नांवर, तसेच आपल्यातील देवाप्रती असलेल्या शरणागतीच्या भावावर परिस्थिती अनुकूल कि प्रतिकूल हे ठरत असते. त्यामुळे साधकांनी ‘आपले क्रियमाण योग्य राहील, साधनेला पूरक राहील’, यांसाठी प्रयत्न करायला हवेत.
इ. जे जमते, ते कुणीही करू शकेल. यात मनाचा संघर्ष होत नाही; पण ‘जे जमत नाही, ते करायचा प्रयत्न करणे’, हीच खरी साधना आहे; कारण यात मनाचा संघर्ष होतो. या संघर्षातून साधकाचे मन घडते आणि पुढे त्याचा मनोलय होतो अन् त्याची साधनेत प्रगती होते.
ई. सध्याचा काळ प्रतिकूल आहे. अनुकूल परिस्थितीत साधना करण्यापेक्षा प्रतिकूल परिस्थितीत साधना करणे कठीण असले, तरी या काळात साधना केल्याचे फळ अधिक आणि लवकर मिळते.
उ. ‘संघर्ष केल्याविना आपल्याला काहीही मिळत नाही’, हे सत्य व्यावहारिक जीवनात आपण नेहमी अनुभवत असतोच. त्यावरून ‘ईश्वरप्राप्तीसाठी आपल्याला किती प्रमाणात संघर्ष करणे आवश्यक आहे’, याची कल्पना येऊ शकते.
१२. सेवा आणि साधना यांचा आढावा मनमोकळेपणाने न देणे
अ. साधकांनी त्यांच्या मनातील विचार उत्तरदायी साधक किंवा संत यांना मनमोकळेपणाने सांगावेत. त्यांच्याकडून साधकांना साधनेची दिशा मिळते आणि साधकांनी त्यानुसार प्रयत्न केले, तर त्यातून त्यांची साधना होते.
आ. साधकांनी आध्यात्मिक दृष्टीकोन चांगल्या प्रकारे देऊ शकतात आणि साधनेत साहाय्य करतात, अशा उत्तरदायी साधकांशी मनमोकळेपणाने अन् शिकण्याच्या स्थितीत राहून बोलावे.
इ. मनमोकळेपणाने बोलणे, म्हणजे मनात जे विचार येतात, ते जसेच्या तसे काहीही न लपवता सांगणे. असेे आपले आत्मनिवेदन असायला हवे.
ई. साधकांनी स्वतःच्या साधनेविषयी नेहमी सतर्क असले पाहिजे. सेवेतून साधना होण्यासाठी साधकांनी उत्तरदायी साधक आणि धर्मप्रचारक संत यांचे मार्गदर्शन घेणे, त्यांना वेळोवेळी साधनेचा आढावा देणे, असे प्रयत्न करायला हवेत. साधकांची ‘उत्तरदायी साधक आणि संत यांच्या माध्यमातून गुरुदेवच आपल्याला सांगत आहेत’, अशी श्रद्धा असायला हवी.’
– (सद़्गुरु) सत्यवान कदम, सिंधुदुर्ग (१२.७.२०२३)