(म्हणे) ‘संपूर्ण जगाचे लक्ष मणीपूरकडे लागले आहे !’ – काँग्रेसी नेते अधीर रंजन चौधरी

  • मणीपूरमध्ये जाऊन काँग्रेसी नेते अधीर रंजन चौधरी बरळले

  • मणीपूर येथील कुकी समाजातील २ पीडितांना भेटणार विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ !

अधीर रंजन चौधरी

नवी देहली – देशातील १६ विरोधी पक्षांचे पहिले संयुक्त संसदीय शिष्टमंडळ २९ जुलै या दिवशी २ दिवसीय दौर्‍यासाठी मणीपूरला पोचले. हे शिष्टमंडळ राज्यातील हिंसाचारग्रस्त भागांना भेटी देणार आहे. या वेळी ते विवस्त्र करून धिंड काढण्यात आलेल्या कुकी जमातीच्या २ पीडित महिलांना भेटणार असल्याचे समजते. या शिष्टमंडळाचे नेतृत्व काँग्रेसच्या संसदीय गटाचे नेते अधीर रंजन चौधरी करत असून यामध्ये २० खासदारांचा समावेश आहे. शिष्टमंडळ हिंसाचारामुळे तात्पुरत्या छावण्यांमध्ये रहाणार्‍यांच्या समस्या जाणून घेणार आहे. या प्रकरणावर भाष्य करतांना मणीपूरची राजधानी इंफाळ येथे पोचल्यावर काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी बरळले. ते म्हणाले की, आम्ही राज्यात कोणतेही राजकारण करण्यासाठी आलो नाही. आम्हाला हिंसाचारास पूर्णविराम लावायचा आहे आणि शांतता पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. संपूर्ण जगाचे लक्ष मणीपूरकडे लागले आहे.

यावर केंद्र सरकारकडून प्रतिक्रिया व्यक्त करतांना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, हा काँग्रेसचा केवळ एक देखावा असून राजकीय पर्यटनाचाच प्रकार आहे. जेव्हा मणीपूर महिनोन्महिने बंद होते, तेव्हा यांनी तोंडातून एक शब्दही बाहेर काढला नाही. मी अधीर रंजन चौधरी यांना विनंती करतो की, त्यांनी त्यांचे शिष्टमंडळ बंगालमध्ये नेऊन तेथे अत्याचाराला सामोरे गेलेल्या पीडित महिलांची व्यथाही जाणून घ्यावी.

  • मणीपूरवरून काही आठवड्यांपूर्वी अमेरिकी राजदूताने केलेल्या विधानाचा निषेध करणारी काँग्रेस आज अमेरिकेचीच भाषा बोलत आहे ! भारताच्या अंतर्गत प्रश्‍नांना आंतरराष्ट्रीय बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या अशा काँग्रेसी नेत्यांना आता भारतियांनी धारेवर धरले पाहिजे !
  • मणीपूर येथील घटना निषेधार्ह आहेच; परंतु पीडितांचा धर्म पाहूनच विरोधी पक्ष नक्राश्रू काढत आहेत, हेही तितकेच खरे आहे ! गेली अनेक वर्षे सहस्रावधी हिंदु मुली आणि महिला लव्ह जिहादच्या बळी पडत असतांना हेच लोक त्याविरोधात केलेल्या कायद्याला मात्र विरोध करतात. त्यांचा हा दुटप्पीपणा जाणा !