जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी दिली भेट
रत्नागिरी – कळवंडे लघु पाटबंधारे प्रकल्पावरील अश्मपटल (पिचींग) घसरले होते. याची तात्काळ नोंद घेत दुरुस्तीचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले. जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनीही प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे या दुरुस्तीच्या कामाला २८ जुलैच्या सकाळपासून आणखी वेग आला आहे.
या माती धरणाचे अश्मपटल घसरलेले निदर्शनास आल्यानंतर संबंधित ठेकेदार आणि यांत्रिकी विभागाला यंत्रसामुग्रीसाठी तातडीने सूचना देवून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
ग्रामस्थांची संवाद साधतांना जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह म्हणाले, ‘‘या धरणात ३० टक्के पाणीसाठा असल्याने या धरणास कोणताही धोका नाही. त्याचसमवेत या धरणाच्या बाजूस नदी किनारी असणार्या बुद्धवाडी, कातळवाडी, कोंडये, बाणेवाडी आणि नावतवाडी या गावांनाही सतर्क रहाण्याविषयी आणि आवश्यक ते साहाय्य करण्याविषयी स्थानिक प्रशासनाला सूचना देण्यात आली आहे.’’