सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ गावे पूरग्रस्त : २३२ नागरिकांचे स्थलांतर

जिल्ह्यातील पूरस्थितीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) – जिल्ह्यात जूनपासून आतापर्यंत १ सहस्र ८८० मि.मी. पाऊस पडला आहे. तिलारी प्रकल्पातून २६० क्युसेक्स (प्रतिसेकंद पाणी सोडणे) एवढा विसर्ग चालू आहे. पावसामुळे २३२ घरांची हानी झाली आहे. १०२ गावे बाधित झाली आहेत. आतापर्यंत २३२ नागरिकांना स्थलांतरित केले आहे. ४५ गावे पूरग्रस्त झाली आहेत.  संभाव्य परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी २५ जुलै या दिवशी दिली.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

कोकण विभागातील पूरपरिस्थितीचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे) २५ जुलै या दिवशी घेतला. या वेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी ही माहिती दिली. आयुक्त कल्याणकर यांनी ‘आगामी काळात पावसाचा अंदाज पहाता प्रशासनाने सतर्क राहून युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात’, असे निर्देश दिले.

समन्वयाने संभाव्य पूरस्थिती हाताळा ! – रवींद्र चव्हाण, पालकमंत्री

श्री. रवींद्र चव्हाण, पालकमंत्री

सिंधुदुर्गनगरी – जिल्ह्यात सातत्याने पाऊस चालू आहे. सध्याची परिस्थिती प्रशासनाने उत्तमरित्या सांभाळली आहे. पावसाचा वाढता जोर लक्षात घेता संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून समन्वयाने परिस्थिती हाताळावी, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.

जिल्ह्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणि उपाययोजना यांविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. या वेळी पालकमंत्री चव्हाण बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आदी उपस्थित होते.

आपत्ती व्यवस्थापन पथक वेळेत न आल्याने पालकमंत्र्यांना विलंब

सावंतवाडी – तालुक्यातील निरुखेवाडी येथे २६ जुलै या दिवशी मोठे झाड पडले होते. शासनाचे आपत्ती व्यवस्थापन पथक निरुखेवाडी येथे वेळीच पोचले नाही. त्याच वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण या मार्गावरून जात होते; परंतु त्यांना झाड पडल्याने थांबावे लागले. अखेर सावंतवाडी येथील ‘सामाजिक बांधिलकी’ या संस्थेच्या आपत्कालीन पथकाने घटनास्थळी जाऊन झाड हटवले आणि त्यानंतर मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा मार्गस्थ होऊ शकला.  या घटनेमुळे संतप्त झालेल्या पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना चांगलेच खडसावले.

जिल्ह्यात दरड कोसळणे, रस्ता खचणे, यांमुळे नागरिकांना धोका कायम

सावंतवाडी – आंबोली घाटात दरड कोसळण्याच्या घटना चालू आहेत. घाटात मुख्य धबधब्यापासून ३ कि.मी. अंतरावरील रस्त्यावर भलामोठा दगड कोसळला. सद्य:स्थितीत घाटातून एकेरी वाहतूक चालू असून सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आंबोली घाटात ठिकठिकाणी गटारच अस्तित्वात नसल्यामुळे पावसाचे, तसेच छोट्या-मोठ्या धबधब्यांचे पाणी रस्त्यावरून दरीच्या दिशेने जात आहे. परिणामी रस्त्याचे संरक्षक कठडे कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंबोलीतील सामाजिक कार्यकर्ते काका भिसे यांनी याविषयी प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर घाटमार्गाच्या लगत असलेले हे गटार साफ करण्याचे काम चालू करण्यात आले आहे.

सरंबळ आणि नेरूर येथे डोंगर खचत असल्याने लोकवस्तीला धोका

देऊळवाडी, सरंबळ आणि कांडरीवाडी, नेरूर येथे डोंगर खचत असून येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. खचत असलेल्या डोंगराच्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी आणि बांधकाम विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांना सावधानतेची चेतावणी

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून हवामान विषयक मिळालेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यात २७ जुलैपर्यंत मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटनासाठी येणार्‍या विशेषत: धबधब्यांच्या ठिकाणी जाणार्‍या पर्यटकांना सावधानतेची चेतावणी जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

कुडाळ-पणदूर-घोटगे मार्ग ६ दिवसांपासून बंद

कळसुली, दिंडवणेवाडी धरणातून पाणी सोडण्यात येत असल्यामुळे कुडाळ तालुक्यातील कुडाळ-पणदूर-घोडगे या रस्त्यावरील वाहतूक गेले ६ दिवस बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह जनतेचीही मोठी असुविधा होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत् करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य लॉरेन्स मान्येकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.