गुरुदेव डॉ. काटेस्‍वामीजी यांच्‍या आश्रमात ‘ऋग्‍वेद संहिता स्‍वाहाकार महायज्ञ’ पार पडला !

पूर्णाहुती देतांना पुरोहित

वडाळा महादेव (अहिल्‍यानगर) (वार्ता.) – गुरुदेव डॉ. काटेस्‍वामीजी आश्रमात ऋग्‍वेद संहिता स्‍वाहाकार महायज्ञ भावपूर्ण वातावरणात पार पडला. गुरुदेव डॉ. काटेस्‍वामीजी आश्रम न्‍यासाचे अध्‍यक्ष श्री. माधवमूर्ती राघवन भास्‍कर यांच्‍या हस्‍ते संकल्‍प सोडण्‍यात आला आणि महायज्ञास प्रारंभ झाला. सातारा येथील वेदशास्‍त्रसंपन्‍न श्री. गोविंदशास्‍त्री जोशी यांच्‍या अधिपत्‍याखाली हा सोहळा पार पडला.

स्‍वाहाकार यज्ञ करतांना पुरोहित

या सोहळ्‍यात पौरोहित्‍य करण्‍यासाठी ४० ब्रह्मवृंद सहभागी झाले होते. गुरुदेव डॉ. काटेस्‍वामीजी महाराज यांनी १०८ यज्ञ करण्‍याचा संकल्‍प केला होता. त्‍यांपैकी ८८ यज्ञ यापूर्वी झाले होते. उर्वरित २० महायज्ञ ९ ते १६ जुलै या कार्यकाळात पार पडले. या काळात सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ६ ते रात्री ९ या काळात मंत्रजागर, तसेच हवन करण्‍यात आले. प्रतिदिन सायंकाळी प्रवचनाचा कार्यक्रम होता. महायज्ञासाठी मोठ्या प्रमाणात तीळ आणि तूप यांचा वापर करण्‍यात आला. १६ जुलै या दिवशी सकाळी महाआरती होऊन ऋग्‍वेद महायज्ञ पूर्णाहुती सोहळा पार पडला. शेवटी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.

त्‍यानंतर गुरुदेव डॉ. काटेस्‍वामीजी यांच्‍या जयंतीनिमित्त इष्‍टी स्‍वाहाकार करण्‍यात आला. १७ जुलै या दिवशी प्रारंभ होऊन १८ जुलै या दिवशी सकाळी पूर्णाहुती झाली. या प्रसंगी गोविंदशास्‍त्री जोशी आणि डॉ. एस्.पी. जोशी यांचे प्रवचन झाले. या वेळी भाविक आणि भक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.