(म्हणे) ‘अटक करण्यात आलेल्यांना केवळ आरोपी म्हणावे, आतंकवादी नाही !’ – गृहमंत्री जी. परमेश्‍वर, कर्नाटक

  • मोठ्या शस्त्रसाठ्यावह अटक करण्यात आलेल्या ५ जिहादी आतंकवाद्यांना कर्नाटकच्या गृहमंत्र्यांकडून पाठीशी घालण्याचा प्रयत्न !

  • भाजपकडून ‘लांगूलचालनाचे राजकारण’ म्हणत काँग्रेसवर टीका !

गृहमंत्री जी. परमेश्‍वर

बेंगळुरू (कर्नाटक) – ‘अटक करण्यात आलेल्यांना केवळ आरोपी म्हणावे, त्यांना सध्या आतंकवादी म्हणता येणार नाही’, असे संतापजनक वक्तव्य राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्‍वर यांनी नुकत्याच अटक करण्यात आलेल्या ५ जिहादी आतंकवाद्यांच्या संदर्भात केले. या आतंकवाद्यांकडून स्फोटके, ७ गावठी बंदुका, ४२ जिवंत काडतुसे, २ चाकू, ४ ग्रेनेड आदी शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्यानंतरही जी. परमेश्‍वर यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केल्यामुळे भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे. माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी ‘काँग्रेस लांगूलचालनाचे राजकारण करत असून आतंकवादी घटनांच्या संदर्भात गंभीर नाही’, असा आरोप केला.

दुसरीकडे कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी जी. परमेश्‍वर यांच्यावर टीका होत असल्यावरून त्यांची पाठराखण करत म्हटले की, घटनेचे अन्वेषण चालू असून सर्वांनी यासंदर्भातील सविस्तर माहिती समोर येईपर्यंत थांबावे.

कर्नाटक पोलिसांनी नुकतेच सैयद सुहेल, उमर, जनिद, मुदासिर आणि जाहिद या ५ आतंकवाद्यांना अटक केली. या सर्वांना बेंगळुरू येथील कनकनगर येथील एका धार्मिक स्थळाजवळ मोठे षड्यंत्र रचत असतांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.

संपादकीय भूमिका 

  • काँग्रेस एकीकडे क्रांतीकारक भगतसिंह यांना ‘आतंकवादी’ संबोधते, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘देशद्रोही’ संबोधून हिणवते, तर दुसरीकडे जिहादी आतंकवादी ओसामा बिन लादेन याचा आदर करतो, तर याकूब मेमन याच्यासाठी आश्रू ढाळते. अशा पक्षाच्या एका राज्याच्या गृहमंत्र्यांकडून अशा प्रकारे वक्तव्य केले जाणे, यात काय आश्‍चर्य ?
  • असले राष्ट्रघातकी गृहमंत्री लाभलेला कर्नाटक भविष्यात आतंकवाद्यांचा अड्डा बनला आणि तेथे राष्ट्रविघातक कारवाया वाढल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !