रतलाम येथे ‘अल् सुफा’ आतंकवादी संघटनेच्या ठिकाणांवर एन्.आय.ए.ची धाड !

आतंकवादी कारवायांचे प्रशिक्षण ठिकाण असणार्‍या ‘पोल्ट्री फार्म’ला ठोकले टाळे !

रतलाम (मध्यप्रदेश) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) रतलाम जिल्ह्यात जुलवानिया गावात ‘अल् सुफा’ या आतंकवादी संघटनेशी संबंधित ठिकाणावर धाड घातली. या संघटनेचा आतंकवादी इम्रान याच्या ‘पोल्ट्री फार्म’ला टाळे ठोकण्यात आले. या ठिकाणी बाँब बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. इम्रान आणि त्याचे साथीदार आतंकवादी कट रचण्यासाठी या ठिकाणाचा वापर करत होते. जयपूर येथे घातपात करण्याचा इम्रान याच्यावर आरोप आहे.

३० मार्च २०२२ या दिवशी राजस्थान आतंकवादविरोधी पथक आणि ‘विशेष कारवाई पथक’ (स्पेशल ऑपरेशन ग्रुप) यांनी चित्तोडगड जिल्ह्यातील निंबाहेडा येथे अल् सुफाच्या ३ आतंकवाद्यांना स्फोटकांसह अटक केली होती. ते जयपूर येथे वेगवेगळ्या ठिकाणी बाँबस्फोट करणार होते. त्यांच्या चौकशीतून रतलाम येथील माहिती मिळाली. यानंतर काही जणांना अटक करण्यात आली. त्यात या सर्वांचा सूत्रधार इम्रान खान याचाही समावेश आहे. तो बाँब आणि अन्य प्रशिक्षण देत होता.

अल् सुफा या संघटनेवर ‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेचा प्रभाव आहे. तिची स्थापना वर्ष २०१२ मध्ये रतलाम येथेच झाली होती. तेव्हा या संघटनेत ४० ते ५० आतंकवादी होते. नंतर त्यात वाढ करण्यात आली. या संघटनेकडून वर्ष २०१४ मध्ये रतमलाम येथे बजरंग दलाचे नेते कपिल राठोड आणि त्यांच्या उपाहारगृहात काम करणारा पुखराज यांची हत्या करण्यात आली होती. यासह वर्ष २०१७ मध्ये रतलाम येथेच तरुण सांखला याची हत्या केली होती.