बांदा (सिंधुदुर्ग) प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे भरा, अन्यथा आंदोलन करणार ! – शीतल राऊळ, माजी सभापती, पंचायत समिती, सावंतवाडी

सावंतवाडी – तालुक्यातील बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांचे स्थानंतर करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचे असलेल्या या आरोग्य केंद्रात १० जुलैपासून वैद्यकीय अधिकारी (एम्.बी.बी.एस्. डॉक्टर) नाही. त्यामुळे रुग्णांची असुविधा होत आहे. येत्या ८ दिवसांत येथील रिक्त असलेली वैद्यकीय अधिकार्‍यांची दोन्ही पदे न भरल्यास आंदोलन करू, अशी चेतावणी सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती शीतल राऊळ यांनी दिली आहे. (कोणत्याही खात्यातील अधिकारी अथवा कर्मचारी यांचे स्थानांतर करतांना ते कार्यरत असलेल्या ठिकाणी समस्या निर्माण होणार नाही, याचा विचार प्रशासन करते कि नाही ? असा प्रश्न निर्माण होतो ! – संपादक)

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र हे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील, तसेच गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांच्या सीमेवर असलेले महत्त्वाचे आरोग्य केंद्र आहे. या परिसरात होणार्‍या अपघातांतील घायाळांना याच केंद्रात उपचार केले जातात, तसेच बांदा आणि परिसरातील ४५ गावांमधील अनेक ग्रामस्थ उपचारासाठी याच आरोग्य केंद्रात येतात. या केंद्रात प्रतिदिन मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात. असे महत्त्वाचे आरोग्य केंद्र असूनही येथे वैद्यकीय अधिकार्‍याची नियुक्ती करण्यापूर्वी कार्यरत असलेल्या अधिकार्‍याचे स्थानांतर का करण्यात आले ? या ठिकाणी सध्या डॉ. मयुरेश पटवर्धन कार्यरत असले, तरी ते शवविच्छेदन किंवा अन्य कामे पाहू शकणार नाहीत. या ठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांची २ पदे संमत असतांना गेली अनेक वर्षे येथे एकच अधिकारी सेवा देत होते. त्यांचेही स्थानांतर करण्यात आल्याने समस्या निर्माण झाली आहे.

संपादकीय भूमिका

  • जनतेच्या आरोग्याशी निगडित समस्येसाठी आंदोलनाची चेतावणी द्यावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
  • प्रशासनाला केवळ आंदोलनाचीच भाषा समजते का ? असा प्रश्न निर्माण होतो !