सिंधुदुर्ग – पावसाळा आणि उद्भवणारे साथीचे आजार या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०३ गावे ‘जोखीमग्रस्त गावे’ म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. भातशेतीच्या हंगामात ‘लेप्टोस्पायरोसिस’चा संसर्ग होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात ही पत्रकार परिषद झाली. या वेळी जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी सई धुरी आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी हर्षल जाधव उपस्थित होते.
या वेळी डॉ. कांबळे म्हणाले, ‘‘पावसाळा चालू झाला असून लेप्टोच्या दृष्टीने सिंधुदुर्ग आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. प्रत्येक आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच जोखीमग्रस्त गावे येथे ‘डायक्लोसायक्लिन’ गोळ्यांचे वाटप केले आहे. आपत्ती प्रवणक्षेत्रांमध्येही पुराचे पाणी साचून साथ रोगाचा फैलाव होऊ नये, या दृष्टीने संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांना सतर्क रहाण्याची सूचना दिली आहे. जोखीमग्रस्त गावांमध्ये उपचार चालू असून जनतेने पाणी उकळून प्यावे, तसेच लक्षणे आढळल्यास जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घ्यावेत. साथ रोगाच्या कालावधीसाठी बांबोळी, गोवा येथील ‘गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय’ येथे साहाय्यता कक्ष चालू करण्यात आला आहे.’’