सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा आज ७ जुलै २०२३ या दिवशी जन्मोत्सव आहे. त्या निमित्ताने…
प.पू. भक्तराज महाराज
सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांचे गुरु आणि सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचा ७ जुलै या दिवशी जन्मोत्सव आहे. त्यानिमित्त प.पू. बाबांच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत. अमूल्य शिकवण देणार्या प.पू. बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम ! |
१. सनातन संस्थेच्या संपर्कात येण्याच्या आधीपासूनच ‘परात्पर गुरु डॉ. आठवले नामजप करून घेत आहेत’, असे जाणवणे
‘मी सनातन संस्थेच्या संपर्कात येण्याच्या आधीपासूनच गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) माझ्याकडून नामजप करून घेत होते. मी ‘सनातन संस्था’ हे नाव ऐकून होते. ‘ही संस्था नेमके कोणते कार्य करते ?’, हे जाणून घ्यायची मला प्रचंड उत्सुकता होती; मात्र मी माया-मोहाच्या विश्वात असल्याने वेळेअभावी ते जाणून घेण्याचे राहून जायचे. तेव्हाही ‘प.पू. गुरुदेवांनी माझा हात घट्ट पकडला होता’, असे मला जाणवायचे. मला साधकांकडून प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयी समजले.
२. स्वप्नात प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन होणे
२ अ. ‘प.पू. भक्तराज महाराज आजोबा आहेत’, असे वाटणे आणि त्यांचे दर्शन झाल्याने दैवी आनंद होणे : एके दिवशी रात्री झोपले असतांना अकस्मात् मला स्वप्नात दिसले, ‘प.पू. भक्तराज महाराज माझ्या जवळ आले आहेत. तेव्हा ‘ते माझे आजोबा आहेत आणि मी त्यांची २ – ३ वर्षांची नात आहे. हे नाते एकाच जन्माचे नाही, तर जन्मोजन्मींचे आहे’, असे मला जाणवत होते. प.पू. आजोबांचे (प.पू. भक्तराज महाराज यांचे) दर्शन झाल्यावर मला अवर्णनीय आनंद झाला. तो दैवी आनंद मला हवाहवासा वाटू लागला. असा आनंद मी आतापर्यंतच्या आयुष्यात अनुभवला नव्हता.
२ आ. प.पू. भक्तराज महाराज यांनी भजने म्हणून घेणे आणि त्या दिवसापासून साधिकेला भजने आवडू लागणे : त्या रात्री आमच्यात (प.पू. भक्तराज महाराज आणि मी) गोड संवाद झाला. त्यांनी मला आनंदप्राप्तीविषयी पुष्कळ काही सांगितले. त्यांनी माझ्याकडून भजने म्हणून घेतली.’ मला भजनाची आवड नव्हती; पण त्या दिवसापासून मला प.पू. भक्तराज महाराज यांची भजने आवडू लागली. ‘मला आनंदप्राप्ती करायची आहे’, असे वाटू लागले.
३. ‘देवानेच सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्याचा निश्चय करून घेतला’, असे जाणवणे
त्या दिवसापासून देवानेच माझ्याकडून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्याचा आणि ईश्वरप्राप्ती करण्याचा निश्चय करून घेतला. ‘गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि साधक यांच्यातील प्रेमळ, निरागस आणि सर्व नात्यांपेक्षा श्रेष्ठ असे गुरु-शिष्याचे नाते अनुभवायचे आहे’, असे मला वाटू लागले.
४. ‘सत्संगात सांगितलेली सूत्रे आचरणात आणायची’, असा निश्चय होणे
काहीही झाले, तरीही ‘अन्य साधकांप्रमाणे साधना करायची आहे’, असे मला वाटत होते; पण ‘साधना म्हणजे नेमके काय ?’ हे मला ठाऊक नव्हते. दळणवळण बंदीच्या कालावधीत गुरुदेवांनी ‘ऑनलाईन’ सत्संग आणि साधक यांच्या माध्यमातून जे शिकवले, ते कृतीत आणायचे’, असा मी निश्चय केला.
५. गुरुदेवांच्या कृपेने पूर्णवेळ साधना करू लागणे आणि आश्रमजीवनाशी एकरूप होऊ शकणे
देवानेच माझ्याकडून गुरुदेवांना अपेक्षित असे प्रयत्न करून घेतले. सत्संगात सांगितल्याप्रमाणे ‘मी लहान होऊन शिकले, तरच मला गुरुदेवांना भेटता येईल’, असे ठरवून मी साधना करायला आरंभ केला. या कालावधीत माझे स्वभावदोष उफाळून येत होते; पण गुरुदेवांच्या कृपेनेच मला त्यांवर मात करता आली. मी सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर अवघ्या ७ मासांतच पूर्णवेळ साधना करू लागले. गुरुदेवांनी मला साधनेची दिशा दाखवली आणि त्यांच्या कृपेनेच मी आश्रमजीवनाशी एकरूप होऊ शकले.
६. कृतज्ञता
‘प.पू. गुरुदेव, तुम्ही साधकांवर करत असलेली आनंदाची उधळण मी अनुभवू शकत आहे’, त्याबद्दल मी प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. प्रार्थना सागर चव्हाण, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (९.५.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |