‘श्री. सीताराम (नाना) आग्रे यांनी सनातनच्या विविध आश्रम आणि सेवाकेंद्र यांमध्ये बांधकामाच्या संबंधित सेवा केल्या. आता ते रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधनारत आहेत. ‘ते करत असलेली प्रार्थना आणि गुरुकृपा’ यांमुळे त्यांना सेवेत आलेल्या अडचणींवर मात करता आली. त्यांना झालेल्या शारीरिक त्रासांत आणि मुलाच्या निधनाच्या प्रसंगात त्यांनी गुरुकृपा अनुभवली. त्या संदर्भात त्यांनी लिहिलेली कृतज्ञतापर सूत्रे येथे दिली आहेत.
१. देवद, पनवेल आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमांत बांधकामाशी संबंधित सेवा करणे अन् उत्तरदायी साधकांनी ‘केरळ येथे सेवेसाठी जाऊ शकता का ?’, असे विचारल्यावर ठेवलेला भाव
‘वर्ष २०११ मध्ये मी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात सेवेला गेलो होतो. नंतर मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेला बोलावले. तेथे मी काही दिवस बांधकामाशी संबंधित सेवा केली. त्यानंतर उत्तरदायी साधकांनी मला विचारले, ‘‘केरळ राज्यात बांधकाम करण्याची सेवा आहे. तुम्ही तिकडे जाल का ?’’ तेव्हा ‘गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने सेवेची संधी मिळाली आहे आणि तेच माझ्याकडून सेवा करून घेणार आहेत. मी केवळ माध्यम आहे’, असा भाव ठेवला आणि उत्तरदायी साधकांना होकार कळवला.
२. केरळ येथे बांधकामाशी संबंधित सेवा करण्यासाठी जाणे
२ अ. केरळ येथे गेल्यानंतर श्रीकृष्णाला केलेली प्रार्थना ! : केरळ येथील वातावरण आणि हवामान गोवा येथील वातावरण अन् हवामान यांपेक्षा वेगळे आहे. मी केरळ येथे गेल्यानंतर श्रीकृष्णाला प्रार्थना केली, ‘तूच मला या वातावरणात सुरक्षित ठेवून माझ्याकडून गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा करून घे.’
२ आ. सेवेला आरंभ करण्यापूर्वी प्रार्थना करणे : मी सेवेला आरंभ करण्यापूर्वी केरळ येथील साधकांनी मला तेथील स्थिती समजावून सांगितली. मी प्रतिदिन सकाळी सेवेच्या ठिकाणी आल्यावर देवाला उदबत्ती ओवाळून ‘माझ्याभोवती संरक्षककवच निर्माण व्हावे’, यासाठी प्रार्थना करत असे.
२ इ. एका व्यक्तीने सनातनला विरोध करणे, साधकाने देवाला प्रार्थना करणे आणि गुरुदेवांच्या कृपेने त्या व्यक्तीत झालेला पालट : आमच्या शेजारी रहाणारे सनातनचे विरोधक होते. ते साधकांकडे रागाने पहात असत. मी देवाला करत असलेल्या प्रार्थनेचा परिणाम असा झाला की, ‘काही दिवसांनी ते मालक हसरा चेहरा करून आमच्याकडे पहायला लागले आणि नंतर आमच्याशी बोलायलाही लागले.’ गुरुदेवांच्या कृपेनेच हे सर्व घडत होते.
२ ई. बांधकामाच्या ठिकाणी होत असलेला इतरांचा हस्तक्षेप; मात्र गुरुदेवांच्या कृपेने त्याचा त्रास न होणे : केरळमध्ये कुठे बांधकाम चालू झाले आणि गाडीने काही साहित्य आणले की, तेथील एका संघटनेची माणसे साहित्य उतरवण्यासाठी उपस्थित होत असत. त्यांच्याकडून साहित्य उतरवून घेतले नाही, तर ते दादागिरी करून पैसे घेऊन जायचे. त्यामुळे कोणतेही साहित्य आले की, त्या संघटनेच्या माणसांकडूनच उतरवून घेतले जायचे.
एखाद्या ठिकाणी काम चालू झाले की, तेथील लोक आणि एका राजकीय पक्षाची माणसे त्या ठिकाणी येऊन ‘आमची माणसे कामाला ठेवा’, असे सांगायचे. त्यामुळे ठेकेदार आणि कामगार घाबरत असत.
ठेकेदार त्या माणसांना माझ्याकडे पाठवत असत. ते लोक आले की, मी मनात देवाला प्रार्थना करत असे आणि हात जोडून त्यांना ‘नमस्कार’ असे म्हणत असे. मी त्या लोकांचे म्हणणे ऐकून घेत असे. ते लोक मला ‘तुमच्या मालकाला कार्यालयात पाठवा’, असे सांगायचे. तेव्हा मी त्यांना होकार देत असे. मी श्रीकृष्ण आणि गुरुदेव यांना ‘बांधकामाच्या सेवेत असे अडथळे येत आहेत. ते तुम्हीच दूर करा आणि आम्हाला मार्ग दाखवा’, अशी प्रार्थना करत असे. गुरुदेवांच्या कृपेने बांधकामाची सेवा पूर्ण होईपर्यंत ते लोक आलेच नाहीत. तेव्हा माझी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
२ उ. सेवा करतांना झालेला शारीरिक त्रास आणि वेदना गुरुदेवांच्या कृपेने सुसह्य होणे : इमारतीच्या बाहेरील सेवा पूर्ण झाली. इमारतीच्या आतील सेवा करणे शेष होते. तेव्हा माझा उजव्या पायाचा घोटा सुजला आणि तेथे व्रण (जखम) झाला. त्यावर औषधोपचार चालू होते. तेव्हा मला वेदना होत असत आणि गुरुदेवच वेदना सहन करण्याची शक्ती देत होते. त्या कालावधीत केरळ येथील साधकांनी मला पुष्कळ साहाय्य केले.
३. रामनाथी, मिरज आणि देवद आश्रमात सेवा करणे
केरळ येथील सेवा पूर्ण झाल्यानंतर मी वर्ष २०१५ मध्ये रामनाथी आश्रमात सेवेला आलो. तेथे १ सप्ताह राहून मी सनातनच्या मिरज आश्रमात बांधकामाशी संबंधित सेवा करण्यासाठी गेलो. तेथे अनुमाने सव्वा मास सेवा केल्यानंतर मी देवद आश्रमात सेवेसाठी गेलो.
४. रामनाथी आश्रमात सेवा करण्यासाठी पुन्हा येणे
वर्ष २०१६ मध्ये मी पुन्हा रामनाथी आश्रमात बांधकामाशी संबंधित सेवा करण्यासाठी आलो.
४ अ. शारीरिक त्रास होत असतांना गुरुदेवांची कृपा अनुभवणे
१. रामनाथीला सेवा करत असतांना अकस्मात् माझ्या उजव्या पायाला सूज आली. मी वैद्यांचे उपचार घेत होतो आणि नामजपादी उपायही करत होतो.
२. त्यानंतर पुन्हा माझी सेवा चालू झाली. एके दिवशी अकस्मात् माझे पूर्ण शरीर आखडले (जखडले) गेले. माझ्या शरिरातील प्रत्येक सांध्यात वेदना होत होत्या. मला उठता-बसता येत नव्हते. माझ्यावर वैद्यकीय उपचार चालू होते; पण त्यांचा परिणाम जाणवत नव्हता. नंतर माझ्यावर नसचिकित्सा (न्युरोथेरपीचे उपाय) करण्यात आली. तेव्हा मला थोडे बरे वाटू लागले; मात्र माझ्या उजव्या पायाला आलेली सूज न्यून होत नव्हती. मला काठीचा आधार घेऊन चालावे लागत होते. मला वेदना होतच होत्या. श्री गुरुदेवच मला वेदना सहन करण्याची शक्ती देत होते.
– श्री. सीताराम (नाना) आग्रे (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ६९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.४.२०२४) (क्रमश:)
या लेखातील पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लीक करा : https://sanatanprabhat.org/marathi/871421.html
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |