बंगालमध्ये सरकारी नोकरीमध्ये बंगाली भाषा येणे अनिवार्य ! – तृणमूल काँग्रेस सरकारचा निर्णय  

कोलकाता (बंगाल) – बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने राज्यात सरकारी नोकरीसाठीच्या परीक्षेतील बंगाली भाषेतील प्रश्‍नपत्रिका अनिवार्य केली आहे. तसेच हिंदी, संथाली आणि उर्दू भाषांमधील प्रश्‍नपत्रिका बंद करण्यात आली आहे. परीक्षेत येणार्‍या बंगाली भाषेतील प्रश्‍न दहावीच्या परीक्षेसारखेच असतील.

बंगालच्या विद्यार्थ्यांना बंगाली भाषा अनिवार्य करण्यात आल्याने कोणतीही अडचण नाही. उलट राज्य सरकारच्या वतीने चालवल्या जाणार्‍या हिंदी, उर्दू आणि संथाली माध्यमांच्या शाळांमध्ये दहावीपर्यंत बंगाली भाषा शिकणे सक्तीची करावी, अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे. या शाळांमध्ये बंगाली भाषा सक्तीची न केल्यामुळे या शाळांमधून बाहेर पडणार्‍या मुलांना बंगाली भाषा येत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

संपादकीय भूमिका

अन्य राज्यांनीही त्यांच्या राजभाषेविषयी असा निर्णय घेतला, तर आश्‍चर्य वाटणार नाही !