छत्तीसगडमध्‍ये गेल्‍या ४ वर्षांत हिंदूंच्‍या धर्मांतरामध्‍ये वाढ ! – सौ. ज्‍योती शर्मा, प्रांत सहसंयोजक, हिंदु जागरण मंच, छत्तीसगड

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवातील चौथ्‍या दिवशी मान्‍यवरांनी व्‍यक्‍त केलेले उद़्‍बोधक विचार

सौ. ज्‍योती शर्मा

विद्याधिराज सभागृह (रामनाथी, गोवा) – कोणत्‍याही राज्‍यात होत नसेल, एवढे हिंदूंचे धर्मांतर छत्तीसगड राज्‍यात चालू आहे. यात मागील ४ वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. ख्रिस्‍ती धर्मप्रचारक पैसे आणि रेशन यांचे प्रलोभन देऊन महिलांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत आहेत. अशा धर्मांतरितांची हिंदु धर्मामध्‍ये ‘घरवापसी’ (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) होणे आवश्‍यक आहे, असे उद़्‍गार  हिंदु जागरण मंचच्‍या प्रांत सहसंयोजक सौ. ज्‍योती शर्मा यांनी ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’त १९ जून २०२३ या दिवशी काढले.

‘छत्तीसगडमध्‍ये धर्मांतराची ‘मोडस ऑपरेंडी’ (व्‍यक्‍ती किंवा समूह यांची कार्य करण्‍याची विशिष्‍ट पद्धत) या विषयावर बोलतांना सौ. शर्मा म्‍हणाल्‍या, ‘‘प्रत्‍येक घरामध्‍ये काहीतरी अडचणी असतात. या अडचणींचा ख्रिस्‍ती धर्मप्रचारक अपलाभ घेतात. ते धर्मांतरासाठी हिंदु महिलांना आर्थिक लाभ, तर मुलांना शिक्षण आणि नोकरी यांचे प्रलोभन देतात. त्‍यासाठी त्‍यांना जवळच्‍या चर्चमध्‍ये बोलावण्‍यात येते. त्‍याप्रमाणे घरातील पुरुष कामावर गेल्‍यावर या महिला दुपारच्‍या वेळी चर्चमध्‍ये जातात. तेथे गेल्‍यानंतर ‘तुमचे देव चांगले नाहीत’, असे सांगण्‍यात येते. त्‍यांनी सांगितल्‍याप्रमाणे हिंदु महिला देवपूजा करणे आणि तुळशीपूजन करणे थांबवतात. दुसर्‍या रविवारपासून पीडित महिलांना पैसे आणि रेशन मिळणे चालू होते. त्‍यांचे पूर्ण धर्मांतर झाल्‍यानंतर ६ मासांनी अशा महिलांना मिळकतीतील १० वा हिस्‍सा दान करण्‍यास सांगण्‍यात येते. ज्‍यांच्‍याकडे पैसे नसतात, त्‍यांना पाद्य्रांना रेशन देण्‍यास सांगण्‍यात येते. त्‍यामुळे घरामध्‍ये भांडणे चालू होतात. अशा धर्मांतरित हिंदूंची घरवापसी करण्‍याचा आम्‍ही प्रयत्न करतो. धर्मांतर केल्‍याचे पुरावे असल्‍यास धर्मांतर करणार्‍या ख्रिस्‍ती धर्मप्रचारकांवर गुन्‍हेही नोंद करता येतात.’’

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात मान्‍यवरांचा गौरव !

श्री. रमेश शिंदे (उजवीकडे) यांचा मारुतिरायाची प्रतिमा देऊन सत्‍कार करतांना पू. विद्यादास महाराज 

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात १८.६.२०२३ या दिवशी मारुतिरायाचे जन्‍मस्‍थान असलेल्‍या किष्‍किंधा (कर्नाटक) पर्वतावरील श्री अंजनेश्‍वर मंदिराचे महंत पू. विद्यादास महाराज यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयाचे अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन, हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे यांचा मारुतिरायाची प्रतिमा देऊन सत्‍कार केला. कर्नाटकातील किष्‍किंधा अंजनेय हनुमान मंदिराचे महंत पू. विद्यादास महाराज यांचा हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्‍य समन्‍वयक श्री. मोहन गौडा यांच्‍या हस्‍ते सन्‍मान करण्‍यात आला.


न्‍यायव्‍यवस्‍थेमध्‍ये कर्मफलन्‍याय सिद्धांताचा समावेश अत्‍यावश्‍यक ! – अधिवक्‍ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्‍ट्रीय अध्‍यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

अधिवक्‍ता वीरेंद्र इचलकरंजीकर

भारतीय विधी आयोगाच्‍या (‘लॉ कमिशन’च्‍या) एका अहवालानुसार वर्ष २००० ते २०१५ या कालावधीत देशातील सत्र न्‍यायालयांनी एकूण १ सहस्र ७९० जणांना फाशीची शिक्षा दिली. त्‍यांतील १ सहस्र ५१२ प्रकरणे उच्‍च आणि सर्वोच्‍च न्‍यायालयांपर्यंत आली. त्‍यामधील केवळ ४.३ टक्‍के जणांना (अनुमाने ६५ जणांना) फाशी झाली. अन्‍यांची निर्दोष मुक्‍तता झाली. मग ‘सत्र न्‍यायालयांच्‍या न्‍यायाधिशांनी चूक केली’, असे म्‍हणायचे का ? एखाद्या सरकारी अधिकार्‍यांनी चूक केली, तर चौकशी केली जाते, मग न्‍यायाधिशांच्‍या चुकीच्‍या निर्णयाचे काय ? अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयाने वर्ष १९७६ मध्‍ये ४ जणांना फाशीची शिक्षा सुनावली. त्‍यांतील एक पोलीस चकमकीत मारला गेला, एकाला फाशी झाली, तर अन्‍य दोघांच्‍या दयेच्‍या अर्जावरून त्‍यांना जन्‍मठेपेची शिक्षा देण्‍यात आली. एकाच प्रकारचा गुन्‍हा असूनही गुन्‍हेगारांना वेगवेगळी शिक्षा कशी होते ? यामागे कर्मफलसिद्धांत आहे का ? जेव्‍हा एखाद्याकडून बलात्‍कारासारखा गुन्‍हा होतो, तेव्‍हा त्‍यामागे ‘काम’ आणि ‘क्रोध’ या षड्‍रिपूंमधील दोषांचा समावेश असतो. यावर अभ्‍यास व्‍हायला नको का ? विविध गुन्‍ह्यांचे खटले चालवण्‍यासाठी विशेष न्‍यायालयांची स्‍थापना केली जाते, नवनवीन कायदे केले जातात; परंतु हे गुन्‍हे ज्‍या षड्‍रिपूंमुळे होतात, त्‍यांवर अभ्‍यास कधी होणार ? डोळ्‍यांवर पट्टी असलेली न्‍यायदेवतेची मूर्ती कर्मफलन्‍याय सिद्धांत मानत नसलेल्‍या पाश्‍चात्त्य संकल्‍पनेच्‍या आधारावर आहे. एखाद्या खटल्‍याच्‍या सुनावणीच्‍या वेळी न्‍यायालय अमेरिका, इंग्‍लंड या देशांतील निर्णयाचा अभ्‍यास करते; परंतु आपल्‍या देशातील कर्मफलसिद्धांताचा अभ्‍यास का होत नाही ? न्‍यायव्‍यवस्‍थेमध्‍ये कर्मफलन्‍याय सिद्धांताच्‍या समावेश अत्‍यावश्‍यक आहे.


‘लव्‍ह जिहाद’चा उपयोग करून भारतात ‘मिनी पाकिस्‍तान’ (छोटे पाकिस्‍तान) निर्माण होत आहेत ! – सौ. भक्‍ती डाफळे, समन्‍वयक, हिंदु जनजागृती समिती, सातारा

सौ. भक्‍ती डाफळे

छत्तीसगड येथील आदिवासी भागांत बांगलादेशातून आलेले मुसलमान हे हिंदु आदिवासी युवतींशी विवाह करून घरजावई होत आहेत. यातून आदिवासींची भूमी हडपण्‍याचे षड्‍यंत्र आहे. अशा प्रकारे छत्तीसगड येथील एक गाव पूर्ण मुसलमानबहुल झाले आहे. लव्‍ह जिहादचा उपयोग करून अशा पद्धतीने भारतात ‘मिनी पाकिस्‍तान’ निर्माण होत आहेत. पूर्वी मोगल हिंदूंना भिंतीमध्‍ये चिणून मारत होते. सद्य:स्‍थितीत हिंदु युवतींचे तुकडे करून शीतकपाटात ठेवले जात आहेत. मोगलांनी तलवारीच्‍या जोरावर हिंदूंचे धर्मांतर केले. आता प्रेमाच्‍या जाळ्‍यात फसवून हिंदु युवतींचे धर्मांतर केले जात आहे. लव्‍ह जिहाद रोखण्‍यासाठी हिंदु युवतींना आपला गौरवशाली इतिहास सांगायला हवा. संस्‍कारी मातेमुळेच आपणाला छत्रपती शिवाजी महाराज लाभले. हिंदु युवतींनी धर्मशिक्षण घेतले, तर त्‍या लव्‍ह जिहादला बळी पडणार नाहीत. हिंदु युवतींना हिंदु संस्‍कृती शिकवायला हवी. धर्मानुसार आचरण केले, तर लव्‍ह जिहादमध्‍ये फसले जाणार नाही. लव्‍ह जिहादविषयी गावागावांत जागृती करण्‍यासाठी आपणाला अभियान राबवायचे आहे. आपण वसतीगृह, गाव, शहर येथील हिंदु युवतींना धर्मशिक्षण आणि स्‍वसंरक्षण प्रशिक्षण द्यायला हवे. या अभियानात धर्मप्रेमींनी सहभागी व्‍हावे.


हिंदूंनी धर्मांतरित हिंदूंना स्‍वधर्मात आणण्‍याचे कार्य मोठ्या प्रमाणात करावे ! – राहुल दिवाण, अध्‍यक्ष, शरयू ट्रस्‍ट, नवी देहली

श्री. राहुल दिवाण

‘पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने भारताला वर्ष २०४७ पर्यंत ‘इस्‍लामिक राष्‍ट्र’ करण्‍याची घोषणा केली आहे. लव्‍ह जिहाद, भूमी (लँड) जिहाद यासमवेत आता ‘ब्‍लॅक मॅजिक (काळी जादू) जिहाद’ही करण्‍यात येत आहे. ‘हलाल’ची अर्थव्‍यवस्‍था भारताच्‍या अर्थव्‍यवस्‍थेएवढी झाली आहे. मुसलमानांची वाढती संख्‍या आणि हिंदूंची घटती संख्‍या हे भारताला पुन्‍हा विभाजनाकडे नेत आहे. यातून भविष्‍यात गृहयुद्ध निश्‍चित आहे. या परिस्‍थितीतही हिंदू आक्रमणाची नाही, तर संरक्षणनीती अवलंबत आहेत. यापुढे हिंदूंनी विस्‍तारवादी भूमिका स्‍वीकारायला हवी. यापूर्वीही भारत अखंड होता, हे हिंदूंनी लक्षात घ्‍यायला हवे. वर्ष २०३० पर्यंत हिंदूंनी १० कोटी धर्मांतरितांना त्‍यांच्‍या इच्‍छेने पुन्‍हा स्‍वधर्मात आणण्‍याचे ध्‍येय ठेवायला हवे. यासाठी सर्व मंदिरांमध्‍ये घरवापसीचे फलक लावायला हवेत. धर्मांतर केलेल्‍या हिंदूंना पुन्‍हा हिंदु धर्मात घेण्‍यासाठी मंदिरांमध्‍ये विधी करायला हवेत. ख्रिस्‍ती मिशनरी हिंदूंचे धर्मांतर करत असतील, तर हिंदूंनीही धर्मांतरित हिंदूंना स्‍वधर्मात आणण्‍याचे कार्य मोठ्या प्रमाणात करायला हवे.


हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी हिंदूंना संघर्ष करावा लागेल ! – जुगल किशोर तिवारी, संरक्षक, अखिल भारतीय ब्राह्मण एकता परिषद, उत्तरप्रदेश

श्री. जुगल किशोर तिवारी

जातीव्‍यवस्‍था ही देशापुढे समस्‍या आहे. जाती आपण निर्माण केलेल्‍या नाहीत. आपल्‍या व्‍यवसायातून जाती निर्माण झाल्‍या आहेत. काही राजकीय पक्षही जातीच्‍या आधारे बनले आहेत. अनेक राजकीय पक्षांमध्‍ये पदेही जातीच्‍या आधारे दिली जातात. निवडून येण्‍यासाठी राजकीय पक्षांना जातीचा आधार घ्‍यावा लागतो. तसेच त्‍या जातींच्‍या आधारे ते त्‍यांना आरक्षण देण्‍याचा प्रयत्नही करतात. याचसमवेत राजकीय पक्षांकडून विविध प्रकारची आमिषेही दाखवली जातात. सद्यःस्‍थितीत हिंदू जातींमध्‍ये विभागले आहेत आणि यामध्‍ये देवता अन् महापुरुष यांनाही जातीनुसार विभागले जात आहे. असे करतांना अन्‍य जातीच्‍या महापुरुषांवर टिका करण्‍याचा कुणालाही अधिकार नाही. त्‍यांच्‍यावर टीका करणे, हा कायद्यान्‍वये गुन्‍हा आहे. संघर्ष आणि आव्‍हाने ही कधी आपल्‍या मार्गात बाधा असत नाहीत, तर ती नवीन संधी निर्माण करतात. भगवान श्रीकृष्‍ण, प्रभु श्रीराम यांनाही संघर्ष करावा लागला. त्‍याप्रमाणे हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी संघर्ष करावा लागेल.