महाराष्ट्रानंतर आता उत्तराखंडमधील ३ मंदिरांतही वस्त्रसंहिता लागू !

महानिर्वाणी आखाड्याकडून घोषणा !

(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)

ऋषिकेश (उत्तराखंड) – महाराष्ट्रातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांना प्रवेश करण्यासाठी वस्त्रसंहिता लागू करण्याचा अभिनंदनीय निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रानंतर आता उत्तराखंड राज्यातील ३ मंदिरांमध्येही स्त्रिया आणि युवती यांच्यासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. यांमध्ये हरिद्वार येथील दक्ष प्रजापति मंदिर, पौडी येथील नीलकंठ महादेव मंदिर आणि देहराडूनमधील टपकेश्‍वर महादेव मंदिर यांचा समावेश आहे. या तीनही मंदिरांचे व्यवस्थापन महानिर्वाणी आखाड्याकडे आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींना ‘स्कर्ट’ अथवा ‘शॉर्ट’ परिधान करून मंदिरात प्रवेश करण्याची अनुमती नसेल. महिलांच्या शरिराचा ८० टक्क्यांपेक्षा अधिक भाग झाकलेला हवा, असे महानिर्वाणी आखाड्याने दिलेल्या आदेशात म्हटले आहे. आखाड्याचे सचिव महंत रविंदर पुरी म्हणाले की, भाविकांनी मंदिरांमध्ये स्वदेशी पारंपरिक कपडे परिधान करूनच जायला हवे. मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी आधी लोकांना आवाहन केले गेले होते. आता यासाठी आदेश द्यावा लागला आहे. देहराडूनच्या टपकेश्‍वर महादेव मंदिरामध्ये याचा एक फलकही लावण्यात आला आहे.