अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण !

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांची घोषणा

चौंडी (जिल्हा नगर) – पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीच्या निमित्ताने चौंडी येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण करण्याची घोषणा केली. या प्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श ठेवून आम्ही राज्यकारभार करत आहोत. त्यामुळे आम्ही अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.’’ नगरच्या स्थापनेला ५३२ वर्षे पूर्ण झाली असून मलीक अहमदच्या नावावरून अहमदनगर नाव पडले, असे सांगितले जाते.

अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य दैदीप्यमान ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘राजमाता अहिल्यादेवी होळकर नसत्या, तर काशी राहिली नसती, दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आपला धर्म दिसला नसता.

अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य दैदीप्यमान आहे. आपले सरकार हिंदुत्वनिष्ठ असल्याने अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव दिले गेले पाहिजे.’’

सरकारने यापूर्वी पालटली आहेत २ जिल्ह्यांची नावे !

राज्य सरकारने यापूर्वी उस्मानाबादचे ‘धाराशीव’ आणि औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामकरण केले आहे. त्यामुळे या निर्णयाविषयी सामान्य नागरिकांमधून, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.