पाटो, पणजी येथे साकारणार सर्वांत उंच प्रशासन स्तंभ ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
पणजी, ३० मे (वार्ता.) – पाटो, पणजी येथे राज्य प्रशासनासाठी इमारत उभारली जाणार आहे. प्रशासन स्तंभ असे या इमारतीचे नाव असेल आणि ही पणजीतील सर्वांत मोठी इमारत असेल. पुढील २ मासांत या इमारतीचे भूमीपूजन आणि पायाभरणी केली जाण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आलेली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. घटक राज्यदिनाच्या मुहूर्तावर ३० मे या दिवशी पर्वरी येथील विधानसभा संकुलातील जुन्या मिनिस्टर ब्लॉकचे नूतनीकरण आणि त्याचे मंत्रालय असे नामकरण केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. नूतनीकरण आणि नामकरण सोहळा वैशिष्ट्यपूर्ण झाला; मात्र या सोहळ्याला विरोधी पक्षाचा एकही आमदार अथवा पदाधिकारी उपस्थित नव्हता. याप्रसंगी मंत्रीगण आणि अन्य मान्यवर यांची उपस्थिती होती. पुढील ५० वर्षांच्या आवश्यकता लक्षात घेऊन मंत्रालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे, असे या वेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
(सौजन्य : OHeraldo Goa)
असे आहे नवीन कार्यालयमंत्रालयाच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच श्री गणेशमूर्ती आहे. तिसर्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे प्रशस्त आणि सुसज्ज असे कार्यालय आहे. कार्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी भगवान श्रीविष्णूचे विश्वरूप दर्शन असलेला कोरीव स्तंभ उभारण्यात आला आहे. ही सुंदर कलाकृती खास उडुपी, कर्नाटक येथून बनवून घेण्यात आली आहे. कार्यालयात प्रवेश केल्यावर समोर मुख्यमंत्र्यांचे आसन आणि त्यामागे देशाचे बोधचिन्ह त्रिमूर्ती सिंह आणि त्याखाली सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य आहे. मुख्यमंत्र्यांच्या आसनाच्या उजवीकडे श्रीकृष्णाची बासरीधारी मूर्ती आहे. |
(सौजन्य : Goa Today 24×7 News)
क्षणचित्रे
१. उद्घाटन सोहळ्याच्या वेळी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर सनई-चौघड्यांच्या वादनाने मंगल वातावरण मंगलमय झाले होते. कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वन्दे मातरम् हे राष्ट्रीय गीत म्हणून झाली.
२. मंत्रालयाचा उद्घाटन फलक संस्कृत भाषेत लिहिला आहे, तसेच मंत्रालयातील अनेक फलक आणि खोल्या यांची नावे संस्कृत भाषेत आहेत.
३. आज पूजा विधी केल्याने पादत्राणे बाहेर काढूनच सर्वांनी मंत्रालयात प्रवेश केला.