|
(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)
अमरावती, ३० मे (वार्ता.) – जळगाव येथे ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ या दिवशी मंदिरे अन् धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ झालेल्या राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’त, तसेच अमरावती येथील प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात संमत झालेल्या ठरावानुसार अमरावती येथील ९ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय ३० मे या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत घोषित करण्यात आला. श्री महाकालीमाता शक्तीपीठ येथे ही पत्रकार परिषद पार पडली. त्याच वेळी वस्त्रसंहितेविषयी माहिती देणार्या फलकाचे अनावरणही करण्यात आले.
वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेल्या मंदिरांमध्ये श्री महाकाली शक्तीपीठ, श्री अंबादेवी संस्थान, श्री बालाजी मंदिर (जयस्तंभ चौक), श्री पिंगळादेवी देवस्थान (नेर पिंगळाई), श्री संतोषीमाता मंदिर, श्री आशा-मनीषादेवी संस्थान (दर्यापूर), श्री लक्ष्मी-नारायण देवस्थान (देवळी, अचलपूर), श्री शैतुतबाग हनुमान मंदिर (परतवाडा) आणि श्री दुर्गामाता मंदिर (वैष्णोधाम) या ९ मंदिरांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त येत्या २ मासांंत अमरावतीतील १६ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक –
मंदिरांची संस्कृती जपण्यासाठी वस्त्रसंहिता अत्यावश्यक ! – सुनील घनवट
मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचे महत्त्व सांगतांना ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘शासकीय कार्यालये, तसेच देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खासगी आस्थापने, शाळा-महाविद्यालय, न्यायालय, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे. मंदिरांची संस्कृती जपण्यासाठी मंदिरांत वस्त्रसंहिता अत्यावश्यक आहे. त्यामुळे नागपूरनंतर आता अमरावती येथील ८ मंदिरांमध्ये आम्ही वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.’’
मंदिराच्या पावित्र्यरक्षणासाठी वस्त्रसंहिता हवीच ! – पू. शक्तीमहाराज, पीठाधीश्वर, श्री महाकालीमाता शक्तीपीठ
मंदिर संस्कृती रक्षणासाठी वस्त्रसंहिता अत्यावश्यक आहे. यासाठी आम्ही श्री महाकाली शक्तीपीठ याठिकाणी आजपासूनच फलक लावत आहोत. अमरावती जिल्ह्यातील अनेक मंदिरांमध्येही आम्ही असा फलक लावणार आहोत.
श्री अंबादेवी संस्थानच्या विश्वस्त सौ. मीनाताई पाठक आणि अधिवक्ता राजेंद्र पांडे यांनी ‘अंबादेवी संस्थानमध्ये तोकडे कपडे घालून आलेल्यांसाठी ओढणी, धोतर इत्यादींची पर्यायी व्यवस्था करू आणि त्यांचे प्रबोधन करू’, असे घोषित केले. अन्य उपस्थित देवस्थानांनीसुद्धा लवकरच वस्त्रसंहितेविषयीचे फलक लावणार असून या निर्णयाला समर्थन असल्याचे घोषित केले.
या वेळी श्री अंबादेवी मंदिर संस्थानचे विश्वस्त अधिवक्ता राजेंद्र पांडे, श्री संतोषीमाता मंदिराचे अध्यक्ष श्री. जयेशभाई राजा, श्री बालाजी मंदिर, जयस्तंभ चौकचे श्री. राजेश हेडा, श्री पिंगळादेवी संस्थान, नेर पिंगळाईचे अध्यक्ष श्री. विनीत पाखोडे, देवस्थान सेवा समितीचे सचिव श्री. अनुप जयस्वाल, श्री दुर्गामाता मंदिराचे श्री. नंदकिशोर दुबे, हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर, अखिल भारतीय हिंदु महासभेचे प्रदेशाध्यक्ष श्री. नितीन व्यास, समाजसेविका सौ. वृंदा मुक्तेवार हे उपस्थित होते. सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी केले.
हे ही पहा –
|