छत्रपती शिवरायांचे कार्य ऊर्जादायी ! – गणेश नाईक, आमदार

आमदार गणेश नाईक

नवी मुंबई, २९ मे (वार्ता.)  – छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जगाला ऊर्जा देणारे आहे. जगाच्‍या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍यासारखा सुजाण राजा होणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी वाशी येथे केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या ३५० व्‍या शिवराज्‍याभिषेक सोहळ्‍यानिमित्त मुंबई ते दुर्गराज रायगड येथे सहस्र जलकलश घेऊन जाणार्‍या रथयात्रेचे आमदार गणेश नाईक यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीमध्‍ये नवी मुंबईमध्‍ये जल्लोषात स्‍वागत करण्‍यात आले. या वेळी ते बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍यामुळेच आज हिंदूंना हिंदु म्‍हणून सन्‍मानाने जगता येत असल्‍याचे प्रतिपादन अभय जगताप यांनी केले. महाराजांनी स्‍वराज्‍याची स्‍थापना करून अत्‍याचार्‍यांना नेस्‍तनाबूत केल्‍यामुळे हिंदु समाजावरचे अत्‍याचार थांबले आहेत. या रथयात्रेच्‍या माध्‍यमातून प्रत्‍येकाच्‍या मनामध्‍ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जागवण्‍याचा प्रयत्न करणार असल्‍याचे जगताप यांनी सांगितले.