अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयाचे प्रा. अफीफुल्लाह खान यांच्यावर विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप !

  • तक्रार करूनही विश्‍वविद्यालयाच्या निबंधकाकडून दुर्लक्ष !

  • पोलिसांकडून गुन्हा नोंद !

अफीफुल्लाह खानवर  गुन्हा नोंद

अलीगड (उत्तरप्रदेश) – अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयाचे (‘ए.एम्.यू.’चे) प्राध्यापक अफीफुल्लाह खान यांच्या विरोधात लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आरोप करणारी संबंधित विद्यार्थिनी विश्‍वविद्यालयामध्ये पी.एच्डी. (विद्यावाचस्पती) करत असून तिचा शोधप्रबंध (थिसिस) जमा करून घेण्याच्या वेळी आरोपी प्राध्यापकाने तिच्याकडे अश्‍लील मागणी केली. याविरोधात पीडितेने २ मे या दिवशी विश्‍वविद्यालयाच्या निबंधकांकडे तक्रार केली असता त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेवटी २७ मे या दिवशी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केल्यानंतर या प्रकरणी प्राध्यापकाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

पीडितेने सांगितले की, ‘वर्ष २०१७ पासून ती विश्‍वविद्यालयामध्ये पी.एच्डी. करत असून गेल्या ५ वर्षांपासून प्रा. खान माझी छेड काढत होते. यांतर्गत मला अयोग्य प्रकारे स्पर्श करणे, अयोग्य वेळी मला त्यांच्या कार्यालयात बोलावणे, आवश्यकता नसतांना मी अभ्यास करत असलेल्या ठिकाणी जाऊन माझ्या शेजारी बसणे, माझे कपडे, आभूषणे यांविषयी चुकीच्या टिपण्या करणे अशी कृत्ये ते करत होते. यांकडे आधी मी दुर्लक्ष करत होते; परंतु नंतर मी या कृत्यांना विरोध करू लागले. १ मे या दिवशी मी माझा शेवटचा प्रबंध जमा करण्यासाठी गेले असता ६ मासांपूर्वीपर्यंत माझे सर्व काम योग्य असल्याचे सांगणारे प्राध्यापक खान एकाएकी मला विरोध करू लागले आणि माझे संशोधन चुकीचे असल्याचे सांगू लागले. यासह माझ्याकडे अश्‍लील मागणी करू लागले.’ आता या घटनेची निष्पक्ष चौकशी करत असल्याचे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

या प्रकरणी केवळ वासनांध प्राध्यापकच नव्हे, तर त्यांना पाठीशी घालू पहाणार्‍या विश्‍वविद्यालयाच्या निबंधकांवरही कठोर कारवाई होणे आवश्यक !