|
सिंधुदुर्गनगरी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत १४ लाख १६ सहस्र ३७१ विद्यार्थ्यांपैकी ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्र राज्यात कोकण विभागातील ९६.०१ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर मुंबई विभागाचा ८८.१३ टक्के असा सर्वांत न्यून निकाल आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात २.९७ टक्क्यांनी घट झाली आहे. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी ४.५९ टक्क्यांनी अधिक आहे.
सिंधुदुर्ग सर्वाेच्च स्थानी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ८ सहस्र ९८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ८ सहस्र ९५९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. ८ सहस्र ७३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ९७.५१ टक्के इतका लागला आहे. यावर्षीही सिंधुदुर्ग जिल्ह्याने निकालामध्ये सर्वोच्च स्थान राखले आहे.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन !
सावंतवाडी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता पुरवणी परीक्षेत प्रविष्ट होऊन यश संपादन करावे, असे आवाहन मंत्री केसरकर यांनी केले आहे.