गोव्यात जून मासात ‘जी-२०’च्या ३ बैठका होणार !

‘जी-२०’च्या पर्यटन कृती गटाच्या बैठकीत ‘गोवा डिक्लेरेशन’ प्रसिद्ध होणार

पणजी, २५ मे (वार्ता.) – गोव्यात जून २०२३ मध्ये ‘जी-२०’ परिषदेच्या ३ बैठका होणार आहेत. ५ ते ७ जून या कालावधीत तिसरी ‘इंटरनॅशनल फायनान्शियल आर्किटेक्चर वर्किंग ग्रूप’ची, १९ ते २० जून या कालावधीत चौथी पर्यटन कृती गटाची बैठक आणि २१ अन् २२ जून या दिवशी पर्यटनमंत्र्यांची बैठक होणार आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांनी ट्वीट करून दिली.

केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी

केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी ट्वीटमध्ये पुढे म्हणतात,‘‘जी-२०’च्या पर्यटन कृती गटाच्या बैठकीनंतर बैठकीतील फलनिष्पत्ती ‘गोवा डिक्लेरेशन’ या नावाने प्रसिद्ध केली जाणार आहे. गोव्यात होणार्‍या पर्यटन कृती गटाच्या शेवटच्या बैठकीनंतर शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी पर्यटन क्षेत्रातील दिशादर्शन आणि कृती आराखडा निश्चित केला जाणार आहे. पर्यटन कृती गटाची तिसरी बैठक २३ आणि २४ मे या दिवशी श्रीनगर येथे झाली होती. या बैठकीच्या शेवटच्या दिवशी बैठकीत सहभागी झालेल्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवून योग्य दिशादर्शन केले.’’