वेदांमधून मिळालेले विज्ञान पाश्‍चात्त्यांनी स्वतःच्या नावाने प्रसारित केले ! – एस्. सोमनाथ, अध्यक्ष, इस्त्रो

‘इस्त्रो’चे अध्यक्ष एस्. सोमनाथ यांचा गंभीर आरोप

एस्. सोमनाथ

उज्जैन (मध्यप्रदेश) – बीजगणित, वर्गमूळ, काळाची गणना, स्थापत्यशास्त्र, विश्‍वाचा आकार, धातूविज्ञान आणि विमान चालवणे हे वेदांमधून प्रथम शिकवले गेले. वेद हे विज्ञानाचे मूळ आहे; पण हे ज्ञान अरबस्तानातून पाश्‍चात्त्य देशांमध्ये पोचले आणि तेथील शास्त्रज्ञांनी स्वतःच्या नावाने त्याचा प्रचार केला, असा गंभीर आरोप भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रोचे) अध्यक्ष एस्. सोमनाथ यांनी केला आहे. ते उज्जैनच्या ‘महर्षि पाणिनी संस्कृत आणि वेद विद्यापिठा’त विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. पाणिनीने संस्कृतचे व्याकरण लिहिले.

एस्. सोमनाथ म्हणाले की,

१. विविध विषयांचे ज्ञान संस्कृत भाषेत होते आणि या भाषेला लिपी नव्हती. लोक एकमेकांकडून ज्ञान घ्यायचे आणि लक्षात ठेवायचे. पुढे ती लिहिण्यासाठी देवनागरी लिपी वापरली गेली.

२. अभियंते आणि शास्त्रज्ञ यांना संस्कृत खूप आवडते. ही भाषा संगणकासाठी अतिशय सोपी आहे आणि कृत्रिम बुद्धीमत्ता ती सहज वाचू शकते. ‘संस्कृतचा वापर गणनेत कसा करता येईल’, यावर बरेच संशोधन चालू आहे.

३. भारतात संस्कृतमध्ये निर्माण झालेले साहित्य केवळ साहित्यिक दृष्टीकोनातूनच नाही, तर वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही महत्त्वाचे आहे. संस्कृतमधील सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अभ्यास यात भेद नाही.

४. भारतीय शास्त्रज्ञांनी त्यांचे संशोधन प्राचीन काळापासून संस्कृतमध्ये लिहिले आहे; पण नंतर त्यावर फारसे संशोधन झाले नाही. ८ व्या शतकात लिहिलेले ‘सूर्यसिद्धांत’ हे याचे उदाहरण आहे. या पुस्तकात पृथ्वीचा परिघ, सूर्यमाला आणि अनेक गोष्टी लिहिल्या होत्या, ज्याचे श्रेय पाश्‍चिमात्त्य जगाने नंतर घेतले.