धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या कथा वाचनाला अनुमती नाकारण्याची मागणी करणारी याचिका मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळली !

अयोग्य पद्धतीने युक्तीवाद करणार्‍या अधिवक्त्याला न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस !

धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या विरोधातील याचिका मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळली

जबलपूर (मध्यप्रदेश) – राज्यातील बालाघाटा जिल्ह्यातील लिंगा गावातील राणी दुर्गावती महाविद्यालयात २३ आणि २४ मे या दिवशी बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे कथा वाचन होणार आहे. या कथावाचनाला अनुमती न देण्याची मागणी करणारी याचिका मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपिठाने फेटाळली.

१. ‘या याचिकेत धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या कथेमुळे येथील आदिवासी लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील’, असे म्हटले होते. त्यावर न्यायालयाने ‘नेमके कशामुळे भावना दुखावल्या जातील’, हे स्पष्ट करण्यास सांगितल्यावर याचिकाकर्त्याचे अधिवक्ता ते स्पष्ट न करू शकल्याने याचिका फेटाळून लावली.

२. या वेळी अधिवक्त्याने न्यायमूर्ती विवेक अग्रवाल यांच्याशी अयोग्य पद्धतीने युक्तीवाद केला. युक्तीवादाच्या वेळी अधिवक्त्याने राज्यघटनेचा हवाला देत न्यायमूर्तींवर आरोप केला, ‘तुम्ही माझे म्हणणे ऐकूनच घेत नाही. मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र तुम्ही समजूनच घेत नाही. तुम्ही काहीही बोलत आहात.’

 (सौजन्य : Legal Aid Associate)

३. यावर न्यायमूर्ती अग्रवाल यांनी अधिवक्त्याला न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस बजावत कारागृहात टाकण्याची चेतावणी दिली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीही अशाच प्रकारची याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. ती न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतरही पुन्हा त्याच पद्धतीची याचिका प्रविष्ट करण्यात आली.