बेपत्ता मुलीची तक्रार नोंदवायला गेलेल्या वडिलांकडे पोलिसांनी मागितली २५ सहस्र रुपयांची लाच !

प्रातिनिधिक छायाचित्र

बीड – येथील नेकनूर पोलीस ठाण्यात बेपत्ता मुलीविषयी तक्रार नोंदवायला गेलेले दत्ता खराडे यांच्याकडे पोलिसांनी २५ सहस्र रुपयांची लाच मागितल्याचे वृत्त समोर आले आहे. खराडे यांनी पोलीस अधीक्षकांकडे याविषयी तक्रार केली आहे. मुलीला शोधण्यासाठी पोलिसांनी चारचाकी गाडीची मागणी केल्याचेही खराडे यांनी म्हटले आहे. ‘कुंपणच शेत खाणार असेल, तर नेमके जायचे कुणाकडे ?’, असा प्रश्न त्यांनी केला आहे.

देशासह राज्यातील विविध ठिकाणी मुली आणि महिला यांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण प्रचंड आहे. राज्यात गेल्या ३ मासांत ३ सहस्रांहून अधिक तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद आहे. नोंद न झालेल्यांची संख्या मिळून ही संख्या वाढूही शकते.

संपादकीय भूमिका

  • असे पोलीस ज्या राज्यात असतील ते राज्य कधीतरी गुन्हेगारीमुक्त होईल का ? भ्रष्ट पोलिसांमुळे कितीही चांगले कायदे केले, तरी त्याची कार्यवाही होऊ शकत नाही आणि जनतेला सुरक्षा मिळू शकत नाही. भ्रष्ट पोलीस प्रशासन हटवण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली, तरच आदर्श राज्याची निर्मिती होऊ शकते !
  • असे पोलीस हे पोलीस प्रशासनाला कलंकच आहेत. अशांचे स्थानांतर न करता त्यांना बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाकणे आवश्यक !