अंतराळ संशोधनासाठी पैसे खर्च करण्यात भारत जगात ७ व्या क्रमांकावर !

  • अमेरिकेकडून भारताच्या तुलनेत ३२ पटींहून अधिक, तर चीन ६ पटींहून अधिक पैसे केले जातात खर्च !

  •  पाक भारताच्या ३ टक्के पैसा खर्च करत असल्याचे उघड !

अंतराळ ( प्रातिनिधिक छायाचित्र )

द हेग (नेदरलँड्स) – वर्ष २०२२ मध्ये अंतराळ संशोधनासाठी जगभरात १०३ अब्ज अमेरिकी डॉलर (८ लाख ५२ सहस्त्र कोटी रुपये) खर्च करण्यात आले. यामध्ये अमेरिका प्रथम स्थानावर असून तिने ६१.९७ अब्ज डॉलर (५ लाख कोटी रुपयांहून अधिक) खर्च केले आहेत. जगाच्या एकूण खर्चात अमेरिकेचा वाटा ६० टक्क्यांहून अधिक आहे. भारत या सूचीत ७ व्या क्रमांकावर असून त्याने गतवर्षी अंतराळ संशोधनासाठी १.९३ अब्ज अमेरिकी डॉलर (साधारण १५ सहस्र ९७५ कोटी रुपये) खर्च केले आहेत. यावरून अंतराळ संशोधनासाठी अमेरिका भारताच्या तुलनेत ३२ पटींहून अधिक पैसे खर्च करते. ही माहिती द हेग येथील ‘वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स’ या खासगी आस्थापनाने दिली आहे.

१. अमेरिकेनंतर चीनचा क्रमांक असून त्याने वर्ष २०२२ मध्ये ११.९४ अब्ज डॉलर (साधारण ९९ सहस्र कोटी रुपये) खर्च केले आहेत. हे प्रमाणही भारतापेक्षा ६ पटींहून अधिक आहे.
२. चीननंतर जपान, फ्रान्स, रशिया आणि जर्मनी यांचा क्रमांक लागतो.
३. विशेष म्हणजे भुकेकंगाल झालेला पाकही अंतराळ संशोधनासाठी पैसा खर्च करतो. त्याने गेल्या वर्षी ६ कोटी अमेरिकी डॉलर (साधारण ५०० कोटी रुपये) एवढा खर्च केला आहे. हा खर्च भारताच्या तुलनेत केवळ ३ टक्के आहे.