|
मुंबई, १८ मे (वार्ता.) – मुंबईत घरगुती गणेशमूर्ती शाडूच्या मातीच्याच असाव्यात, असा महत्त्वपूर्ण निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला. शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती सिद्ध करणार्या मूर्तीकारांसाठी महानगरपालिका जागा उपलब्ध करून देणार आहे. १७ मे या दिवशी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कोकणातील मूर्तीकार आणि राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी शाडूच्या मातीच्या मूर्तीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरणाला हानीकारण ठरणार्या ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’पासून परावृत्त होण्याचे आवाहन मूर्तीकारांना केले.
‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ऐवजी मूर्तींसाठी योग्य पर्यायाची निवड करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची सूचना या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. शाडूची माती, कागदी लगदे, प्लास्टर ऑफ पॅरिस यांपासून मूर्ती सिद्ध करणारे राज्यातील मूर्तीकार या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी स्वत:ची भूमिका बैठकीत मांडली. मूर्तीकारांनी या बैठकीत त्यांच्यासमोरील विविध अडचणी आणि प्रशासकीय अडथळे यांचा पाढा वाचला. या बैठकीला महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, नीरी संस्था, ‘आयआयटी’चे पदाधिकारी, तसेच शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, तसेच सचिव उपस्थित होते.
मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीतील प्रदूषणकारी घटक कमी करणे अथवा इतर काही पर्याय उपलब्ध करण्यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची आज घोषणा केली, सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई तसेच कोकणातील मूर्तिकार, सार्वजनिक गणेश मंडळांच्या… pic.twitter.com/3fdu5PB1Hm
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 17, 2023
समिती शासनाला अहवाल सादर करणार !
मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या समितीमध्ये जलसंपदा, ग्रामविकास, पर्यावरण, नगरविकास, विधी आणि न्याय या विभागांचे प्रधान सचिव हे सदस्य म्हणून रहातील. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य समितीचे सचिव असतील, तर आयआयटी मुंबई आणि नीरी संस्था यांचे प्रतिनिधी, तसेच डॉ. शरद काळे, डॉ. अजय देशपांडे समितीमध्ये तांत्रिक तज्ञ म्हणून असतील. ही समिती शासनाला पर्यावरणपूरक गणेशमूर्तीविषयीचा अहवाल शासनाला सादर करणार आहे.
सनातनची सात्त्विक गणेशाची प्रतिमा मुख्यमंत्र्यांना भेट !
या वेळी पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती सिद्ध करणारे पनवेल श्री गणेश कला केंद्राचे श्री. प्रमोद बेंद्रे आणि पुणे येथील श्री. चैतन्य तागडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या वेळी सनातन निमित्त श्री गणेशाची प्रतिमा भेट दिली. श्री गणेश कला केंद्राची मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांत सात्त्विक गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्यासाठी एकूण ३५ केंद्रे आहेत.
पर्यावरणपूरक उत्सव ही काळाची आवश्यकता ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उत्सव पर्यावरणपूरक साजरे झाले पाहिजेत, यावर राष्ट्रीय हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालय यांनी निर्देश दिले आहेत. आपण टप्प्याटप्प्याने याकडे वाटचाल करत आहोत. कृत्रिम तलावात घरगुती गणेशमूर्ती विसर्जन करणार्यांची संख्या वाढत आहे.
लोकांचा यास चांगला प्रतिसादही लाभत आहे. मातीच्या मूर्ती, कागदी लगदा किंवा पेंढा वापरूनही मूर्ती मोठ्या प्रमाणावर सिद्ध केल्या जात आहेत. सण आणि उत्सव साजरे करायचे; पण ‘निसर्गाची तोडफोड नको’, हे तत्त्व आपण पाळले पाहिजे. पर्यावरणपूरक उत्सव ही आता काळाची आवश्यकता आहे.
या वेळी मुख्यमंत्र्यांनी कृत्रिम तलाव वाढावेत, तसेच पर्यावरणपूरक उत्सवासाठी अधिकाधिक स्पर्धा घ्याव्यात, असे आवाहन या वेळी केले. सार्वजनिक गणेशोत्सवांना सर्व प्रकारच्या अनुमती एकत्रित उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘एक खिडकी’ योजना राबवण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकार्यांना या वेळी दिली.
शाडूच्या मातीची गणेशमूर्ती पर्यावरणपूरक ! – चैतन्य तागडे, श्री गणेश कला केंद्र
शाडूची माती ही नैसर्गिक असल्यामुळे त्यापासून सिद्ध केलेल्या मूर्तीमुळे कोणत्याही प्रकारे प्रदूषण होत नाही. याउलट कागदी लगद्यापासून सिद्ध केलेल्या मूर्तीमुळे प्रदूषण होते. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती पाण्यात विरघळण्यास वेळ लागतो. त्यामुळे शाडूच्या मातीची गणेशमूर्ती पर्यावरणपूरक आहेत.
हे वाचा :
♦ यंदा गणेशोत्सवासाठी गोव्यात पर्यावरणपूरक आणि सात्त्विक श्री गणेशमूर्ती उपलब्ध
https://sanatanprabhat.org/marathi/682472.html