श्री गणेश कला केंद्र, पुणे आणि अविष्कार कला केंद्र, फोंडा यांचा संयुक्त उपक्रम
फोंडा, १२ मे (वार्ता.) – गोमंतकियांना यंदा गणेशोत्सवात शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेल्या, पर्यावरणपूरक आणि सात्त्विक श्री गणेशमूर्ती उपलब्ध करण्याचा उपक्रम श्री गणेश कला केंद्र, पुणे आणि अविष्कार कला केंद्र, फोंडा यांनी संयुक्त विद्यमाने राबवला आहे. अविष्कार कला केंद्र, फोंडाचे संस्थापक श्री. मनोज गावकर आणि श्री. गुरुदास खंडेपारकर, तसेच श्री गणेश कला केंद्र, पुणेचे श्री. चैतन्य तागडे अन् अमोल मेहता यांनी फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पत्रकार परिषदेत श्री. चैतन्य तागडे म्हणाले,
‘‘श्री गणेश कला केंद्र, पुणे वर्ष २००७ पासून शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेल्या, पर्यावरणपूरक आणि सात्त्विक श्री गणेशमूर्तींचे उत्पादन करण्यात अग्रेसर आहे. संस्थेच्या वतीने प्रतिवर्ष ८ ते १० सहस्र मूर्तींचे महाराष्ट्रात वितरण केले जाते. या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे त्या १०० टक्के पर्यावरणपूरक आहेत. मूर्ती विसर्जित केल्यानंतर ४ घंट्यांच्या आत त्या पाण्यात विरघळतात. मूर्तीसाठी वापरण्यात आलेले रंग नैसर्गिक असल्याने ते लगेच पाण्यात विरघळतात. श्री गणेशमूर्ती ही शाडू मातीपासूनच बनवली पाहिजे आणि अशा मूर्तींमध्येच श्री गणेशतत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट होते. अशा मूर्तींच्या पूजनाचा भक्तांना अधिक प्रमाणात लाभ होतो. त्यामुळे माती वगळता गोळ्या, बिस्किटे, बाटल्या, मसाल्याची पाकिटे अशा कोणत्याही घटकांनी श्री गणेशमूर्ती घडवू नये. गोव्यात बर्याच ठिकाणी शाडूमातीची मूर्ती म्हणून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विकल्या जातात आणि या मूर्ती पर्यावरणाला हानीकारक आहेत. गोवा सरकार याचा गांभीर्याने विचार करत आहे. श्री गणेश कला केंद्र, पुणे ही संस्था शाडूमातीच्या मूर्ती घडवणार्या कलाकारांना प्रोत्साहन देते.
पर्यावरणपूरक आणि सात्त्विक श्री गणेशमूर्ती वितरणाचा तपशील
या मूर्ती प्रामुख्याने १३ ते १८ इंच उंचीच्या असणार आहेत. तसेच मागणी आल्यास १८ इंचापेक्षा मोठ्या मूर्तींही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मूर्तींचे वितरण करणे सोयीचे व्हावे, यासाठी प्रत्येक शहरात व्यावसायिक जोडीदार नेमण्यात आला आहे. या मूर्ती पहाण्यासाठी प्रत्येक शहरात २ दिवस ठेवल्या जाणार आहेत.
श्री गणेशमूर्तींसाठी संपर्क
क्षणचित्र – पत्रकार परिषदेला शाडूमातीपासून बनवलेल्या सात्त्विक गणेशमूर्ती, तसेच मुंबई येथील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ आणि पुणे येथील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई येथील शाडूमातीपासून बनवलेल्या हुबेहुब श्री गणेशमूर्ती ठेवण्यात आल्या होत्या.