केरळमध्ये पकडलेल्या अमली पदर्थाचे मूल्य २५ सहस्र कोटी रुपये !

कोची (केरळ) – भारतीय नौदल आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एन्.सी.बी.) यांनी ३ दिवसांपूर्वी केरळच्या किनारपट्टीवर २ सहस्र ५२५ किलो उच्च दर्जाचे ‘मेथामफेटामाइन’ हे अमली पदार्थ जप्त केले होते. याचे मूल्य १२ ते १५ सहस्र कोटी रुपये असल्याचे प्रारंभी म्हटले गेले होते; मात्र याचे मूल्य २५ सहस्र कोटी रुपये आहे, अशी माहिती नौदल आणि एन्.सी.बी. यांनी दिली. एन्.सी.बी.चे उपमहासंचालक संजयकुमार सिंह यांनी सांगितले की, मूल्याच्या दृष्टीने भारतातील अमली पदार्थांची ही सर्वांत मोठी जप्ती आहे.

एन्.सी.बी.च्या म्हणण्यानुसार हे अमली पदार्थ पाकिस्तानमधील आहे. ते इराणमधील चाबहार बंदरातून नौकेद्वारे आणले जात होते. भारताखेरीज श्रीलंका आणि मालदीव या देशांमध्येही त्याचा पुरवठा होणार होता. ही नौका समुद्रात काही ठिकाणी थांबणार होती. तेथे विविध देशांतून लहान-मोठ्या नौका जवळ येत असत आणि अमली पदार्थ घेऊन परतत असत. त्याआधी ही नौका केरळच्या कोची किनार्‍याजवळ अडवण्यात आली. या अमली पदार्थासह एका पाकिस्तानी व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका 

पकडण्यात आलेल्या अमली पदार्थाचे मूल्य इतके आहे, तर आतापर्यंत न पकडण्यात आलेल्या अमली पदार्थांचे मूल्य किती असेल, याची कल्पना करता येत नाही !