(म्हणे) ‘मुसलमानाला उपमुख्यमंत्री करा !’ – कर्नाटक वक्फ बोर्डाची काँग्रेसकडे मागणी !

  • मुसलमानांमुळे काँग्रेसचा विजय झाल्याने कर्नाटक वक्फ बोर्डाची काँग्रेसकडे मागणी !

  • विजयी ९ पैकी ५ मुसलमान आमदारांना मंत्री बनवा !

  • गृह, महसूल, शिक्षण आदी महत्त्वाची खाती द्या !

बेंगळुरू – कर्नाटकमध्ये भाजपचा दारूण पराभव होण्यामागे राज्यातील मुसलमानांनी काँग्रेसला केलेले एकगठ्ठा मतदान कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता तेथील मुसलमान संघटनांनी काँग्रेसकडे मागण्या करणे चालू केले आहे. राज्यातील वक्फ बोर्डाने राज्यात निवडून आलेल्या ९ आमदारांपैकी एकाला उपमुख्यमंत्री करण्यासह ५ जणांना मंत्री बनवण्याची मागणी केली आहे. इतकेच नव्हे, तर या मंत्र्यांना गृह, महसूल, शिक्षण आदी महत्त्वाची खाती देण्याचीही मागणी केली आहे.

कर्नाटक वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शफी सादी

१. कर्नाटक वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शफी सादी म्हणाले की, राज्यातील ७२ मतदारसंघामध्ये काँग्रेसला केवळ मुसलमानांमुळे विजय मिळाला आहे. मुसलमानांनी काँग्रेसला पुष्कळ काही दिले आहे. आता त्या बदल्यात मुसलमानांना काही तरी मिळाले पाहिजे. यासह आम्हाला धन्यवाद देण्याचे दायित्व काँग्रेसचे आहे. या मागण्यांसाठी आम्ही सुन्नी उलेमा बोर्डाच्या कार्यालयामध्ये आपत्कालीन बैठक आयोजित केली आहे.

२. शफी सादी यांनी निवडणुकीपूर्वी काँग्रेसकडे मागणी केली होती की, ‘राज्यात मुसलमानाला उपमुख्यमंत्री केले पाहिजे. मुसलमानांना ३० ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे.’ प्रत्यक्षात काँग्रेसने १५ मुसलमानांना उमेदवारी दिली आणि त्यांतील ९ जण निवडून आले.

मुख्यमंत्री पदाच्या नावावर अद्याप एकमत नाही !

काँग्रेसला बहुमत मिळाले असले, तरी अद्याप मुख्यमंत्री पदाच्या नावावर एकमत झाले नसल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या अन् प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांच्यात या पदावरून रस्सीखेच चालू असल्याचे सांगितले जात आहे.

संपादकीय भूमिका 

  • मुसलमानांनी काँग्रेसकडे फाळणीची मागणीही अशाच पद्धतीने केली होती आणि काँग्रेसने सत्तेसाठी ती मान्य केली होती ! आताही काँग्रेसने या मागण्या मान्य केल्यास आश्‍चर्य वाटू नये !
  • बहुसंख्य हिंदूंनी कधी काँग्रेस किंवा अन्य कोणत्याही सत्तेत आलेल्या राजकीय पक्षांकडे ‘हिंदु’ म्हणून काही मागितले आहे का ? आणि मागितले, तर एकतरी राजकीय पक्ष हिंदूंना ‘हिंदु’ म्हणून काही देईल का ?